सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : दहावीच्या परीक्षेत शिक्षकाने विद्यार्थ्याचा पेपर लिहिल्याच्या प्रकरणात अडकलेल्या शिक्षकाच्या चौकशीचा जाब शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याला विचारल्याने संतप्त झालेल्या संबंधित अधिकाऱ्याने जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे यांना सभेचे कामकाज सुरू असतानाच ‘मी आत्महत्या करणार’ असा मेसेज पाठविल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत समोर आला. तसेच संबंधित अधिकारी सभागृहातून निघून गेल्याने सदस्य आक्रमक झाले. ‘अशा अधिकाऱ्याची आम्हाला गरज नाही. त्याच्यावर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे,’ अशी जोरदार मागणी सदस्यांनी केली.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सर्वसाधारण सभा झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपाध्यक्ष दादा साईल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, विषय समिती सभापती संतोष साटविलकर, प्रीतेश राऊळ, रुहिता तांबे, अनुराधा नारकर, सदस्य तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. भुईबावडा केंद्रात दहावीच्या परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याचा पेपर शिक्षकाने लिहून दिल्याचे प्रकरण समोर आले होते. त्या शिक्षकाच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या.
या प्रकरणी सदस्य प्रमोद रावराणे सातत्याने आवाज उठवत असून, त्यांनी मागील शिक्षण समितीच्या सभेत शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारला होता. याचाच राग आल्याने संबंधित अधिकाऱ्याने सभा सुरू असतानाच रावराणे यांना आत्महत्या करण्याची धमकी देणारा मेसेज पाठविल्याचा आरोप सभेत करण्यात आला.
सदस्या सुमेधा पाताडे यांनी हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत सदस्यांना धमकी देण्यापर्यंत अधिकाऱ्यांची मजल जात असेल, तर अशा अधिकाऱ्याची गरज काय, असा सवाल केला. संबंधित अधिकाऱ्याला जिल्ह्यात काम करायचे नसेल तर त्याला कार्यमुक्त करावे, अशी मागणीही त्यांनी केली.
या चर्चेत बहुतांश सदस्यांनी सहभाग घेतला. प्रमोद रावराणे यांनी ‘माझ्याजवळ सर्व माहिती आहे; मात्र बोलायलाही भीती वाटते,’ असे सांगत या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित केले. सदस्य संदेश सावंत यांनी संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्याचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.












