पालकमंत्री आणि सतीश सावंत यांच्या पाठपुराव्यातून होणाऱ्या 10 ऑगस्ट च्या बैठकीतून सर्व प्रश्न मार्गी लागावेत.

फोंडाघाट मध्ये आंबा नुकसान भरपाई दरवर्षीपेक्षा खूपच कमी ? काजूची तर गेले तीन वर्ष नाहीच —

बाधित व सदोष हवामान नोंदीमुळे बागायतदारां चे प्रचंड नुकसान ! १००% नुकसानीला अत्यल्प नुकसान भरपाई

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी तांत्रिक त्रुटीमुळे सन २०२५/२६ मधील पुनर्रचित हवामान आधारित आंबा- काजू फळपीक विमा योजना अंतर्गत,भरपाई पासून वंचित आहेत. तर काही भागात अत्यल्प भरपाई खात्यात जमा झाली आहे. त्यामुळे १०० टक्के नुकसान होऊन सुद्धा, अत्यल्प भरपाई मिळाल्याने तर काही भागात भरपाईच मिळाली नसल्याने प्रशासनाच्या कामावर सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे. या शेतकऱ्यांबाबत आवश्यक कार्यवाहीसाठी माझी जि. प.सदस्य सतीश सावंत यांच्या मागणीवरून पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवार १० ऑगस्ट रोजी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत शेतकरी/ बागायतदारांच्या गंभीर प्रश्नांची उकल होऊन भरपाई देण्यात यावी अथवा अत्यल्प बागायतदारांची उर्वरित फरकाची रक्कम त्वरित जमा करावी. आणि काजू पिकांची गेल्या तीन वर्षाची नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी आग्रही मागणी होत आहे.

चालू वर्षी आंबा पिकाचे १००% नुकसान झाले असताना, विमा कंपनीने दरवर्षीपेक्षा खूपच कमी रक्कम बँक खात्यात जमा केल्याने बागायतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच गेले तीन वर्षे फोंडाघाट भागामध्ये काजू बागायतदारांना विम्याची नुकसान भरपाई मिळालेलीच नाही. भात पिकाची नुकसान भरपाई सरकारी नियमाप्रमाणे नाही.याबाबत माहिती घेता, प्रतिकूल हवामानाची नोंद विमा कंपनीच्या सदोष व बाधित केंद्रांमुळे चुकीच्या माहितीवर आधारित झाली. त्यामुळे सध्याची अल्प नुकसान भरपाई बागायतदार यांच्या बँक खात्यावर जमा केली गेली काही विभागात तर दिली गेलीच नाही असे समजते.

या उच्चस्तरीय बैठकीला पालकमंत्री, कृषी सचिव, कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी, भारतीय कृषी विमा कंपनीचे महाव्यवस्थापक, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक, सिंधू. जिल्हा कृषी अधिकारी, सीएससी मुख्य व्यवस्थापक भारतीय कृषी विमा कंपनीचे व्यवस्थापक, स्कायमेट वेदर सर्विस प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी जि.प. अध्यक्ष सतीश सावंत इत्यादी उपस्थित राहणार आहेत.त्यामुळे या बैठकीतील ठोस निर्णयाकडे व कार्यवाही कडे सिंधुदुर्गातील तमाम शेतकरी- बागायतदारांचे लक्ष लागून राहिले आहे….

error: Content is protected !!