सम्यक साहित्य संसदेच्या पुरस्कारांचं वितरण कणकवलीत

ज्येष्ठ साहित्यिक शिवा इंगोले यांच्या हस्ते होणार पुरस्कारांचं वितरण

जेष्ठ पत्रकार विनायक मिठबावकर यांना आ.सो.शेवरे जीवनगौरव, उत्तम सर्वोत्तम काव्यपुरस्काराने स्नेहा कदम यांचा होणार सन्मान

कणकवली (प्रतिनिधी) : सम्यक साहित्य संसदेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या आ.सो. तथा आबा शेवरे जीवनगौरव व उत्तम-सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्यपुरस्कार यांचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत माननीय शिवा इंगोले यांच्या हस्ते व सम्यक साहित्य संसदचे अध्यक्ष तथा प्रसंवादचे संपादक इंजि. अनिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

ऑगस्टच्या 16 तारखेला सकाळी साडेदहा वाजता कणकवलीतील, कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी.एल. सभागृहात संपन्न होणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्याचे उदघाटन प्राचार्य मा. युवराज महालिंगे यांच्या हस्ते होणार असून साहित्यिक व प्रकाशक सुनील हेतकर, माजी उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू, सिंधुदुर्ग अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील प्रभावी वक्ते, लेखक प्रा. डॉ. सोमनाथ कदम, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत कदम, अपरांन्तचे प्रकाश जाधव व दर्पण प्रबोधिनीचे श्रीधर तांबे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सम्यक साहित्य संसद सिंधुदुर्गच्या वतीने परिवर्तनवादी साहित्यविश्वातील कोकणातील आंबेडकरी कवितेचे जनक, सम्यक साहित्य संसद व प्रसंवादचे संस्थापक ज्येष्ठ कवीवर्य आ.सो. तथा आबा शेवरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा आ सो शेवरे जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व राजकीय विश्लेषक विनायक मिठबांवकर यांना प्रदान केला जाणार असून उत्तम-सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्यपुरस्कार ‘शिल्लक भीतीच्या गर्भकोषातून’ या बहुचर्चित काव्यसंग्रहाची कवयित्री स्नेहा कदम यांना प्रदान करण्यात येणार आहे. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ कवी मनोहर सरंबळकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून या कवी संमेलनात मान्यवर कवी कवयित्री उपस्थित रहाणार आहेत.

विनायक मिठबांवकर यांचे व्यक्तिमत्त्व हे केवळ एका साहित्यिकाचे नसून ते सम्यक विचारांची प्रदीप्त मशाल पेटविण्याऱ्या संघर्षशील योद्याचे आहे त्यांनी आपल्या प्रगल्भ लेखणीने अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवून झुंजार पत्रकार या नात्याने बहुजन समाजाच्या व्यथा वेदना शब्दांकित केल्या आहेत. त्यांनी आपल्या सर्जनशील लेखनाने शोषितांच्या जगण्याला शब्द दिले आहेत. विनायक मिठबावकर यांनी गिरणी कामगारांच्या जगण्याचा दस्तऐवज ठरलेली ‘हे जगणे का?’ ही कादंबरी 1972 आणि ‘संधीप्रकाश’ 1973 या कादंबऱ्यांनी वास्तववादी साहित्याला नवी दिशा दिली. त्यांनी कविता, स्फूटलेखन, सदरलेखन, पत्रलेखन, वैचारिकलेखन आणि ललित लेखन अशा विविध साहित्य प्रकारातून लेखन करून समाजमन प्रगल्भ करण्याचे काम केले. त्यांनी सुरू केलेल्या ‘उधाणलाटा’ या साप्ताहिकाने कोकणातील परिवर्तनवादी पत्रकारितेला नवे अधिष्ठान प्राप्त करून दिले.

याशिवाय त्यांनी दैनिक मराठा, कोकण वैभव, शिवनेरी, नवाकाळ, रत्नागिरी टाइम्स, सागर, रत्नभूमी, तरुण भारत, पुढारी यासारख्या वृत्तपत्रातून सत्यनिष्ठेने निर्भिड आवाज बुलुंद केला आहे. तर उत्तम-सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्यपुरस्कार विजेती कवयित्री स्नेहा कदम यांनी प्रचलित शिक्षण व्यवस्थेने जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवलेल्या अस्मितेच्या प्रश्नांना आपल्या विचारधारेचे केंद्रबिंदू बनविले. तथागत गौतम बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता व विज्ञाननिष्ठ आणि मानव मुक्तीच्या विचारांना आपल्या काव्यातून अधोरेखित केले आहे. त्यांनी मानव मुक्तीचा ध्यास घेऊन प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्ध विधायक विद्रोहाने समतेचा ध्वज उंचावत ठेवला आहे. राष्ट्रीय स्तरावर साहित्य अकादमी, नवी दिल्ली येथे निमंत्रित कवियत्री म्हणून त्यांचा गौरव झाला असून त्यांच्या काव्यसंग्रहाला पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य प्रतिभा पुरस्कार,भीमराव कोते विशेष काव्य पुरस्कार, रत्न सिंधू युवा साहित्य कला गौरव पुरस्कार व ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे. तरी या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व साहित्यिक, विचारवंत, कवी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सहकार्यवाह मधुकर मातोंडकर, कोषाध्यक्ष संध्या तांबे हिशोब तपासणीस दीपक तळवडेकर व कार्यवाह राजेश कदम यांनी केले आहे.

error: Content is protected !!