हुतात्मा दत्ताराम कोयंडे यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन तिरंगा सदैव उंच फडकवूया-पो. नि. संजय कातिविले

आचरा-पिरावाडी येथे क्रांती दिन उत्साहात; हुतात्म्यांना अभिवादन करून क्रांती मशाल ज्योत प्रज्वलित

आचरा (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक सुपुत्रांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, म्हणूनच आज आपण स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत. आपल्या पूर्वजांनी मिळवून दिलेले हे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे. पिरावाडीतील वीर हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन देशाचा तिरंगा सदैव अभिमानाने फडकत ठेवूया, असे गौरवोद्गार आचरा पोलीस निरीक्षक संजय कातिविले यांनी काढले.

क्रांती दिनानिमित्त जि. प. शाळा आचरा-पिरावाडी येथे हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी यांनी १९३० साली पुकारलेल्या मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झालेल्या हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्यासह अकरा स्वातंत्र्यसैनिकांच्या पवित्र स्मृतींना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमास आचरा पोलीस निरीक्षक संजय कातिविले, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम पडवळ, ग्रामोन्नती मंडळ आचरा-पिरावाडीचे अध्यक्ष नारायण कुबल, उपाध्यक्ष मंदार खोबरेकर, सचिव वैभव कुमठेकर, परेश तारी, जय कुबल, ग्रा.पं. सदस्य पूर्वा तारी, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, तन्वी जोशी, डॉ. प्रमोद कोळंबकर, अनिल करंजे, गिरीधर सारंग, सुरेंद्र कुबल आदी उपस्थित होते.

तसेच पिरावाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक बुगडे व कर्मचारी वृंद, धनश्री पराडकर, कविता बिर्जे, जि. प. शाळा पिरावाडीचे मुख्याध्यापक सुभाष नाटेकर, विजय जोशी, नंदू तळवलकर यांच्यासह विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर मान्यवरांनी वीर हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या पिरावाडी येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. क्रांतीची मशाल ज्योत प्रज्वलित करून गावातून जनजागृती फेरी काढण्यात आली. या फेरीत विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण जागवली.

स्वातंत्र्यलढ्यात पिरावाडीच्या भूमीने दिलेले योगदान आणि हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांचे बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय कुबल यांनी केले.

error: Content is protected !!