श्री देव रामेश्वर सहकारी सोसायटी चिंदरचा जिल्हा बँकेकडून गौरव
सलग पाच वर्षे उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम
आचरा (प्रतिनिधी) : बँक पातळीवरील वसुलीपात्र कर्जाची १०० टक्के परतफेड करून उत्कृष्ट कर्जवसुलीची परंपरा कायम राखणाऱ्या श्री देव रामेश्वर सहकारी सेवा सोसायटी लि. चिंदर या संस्थेचा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
मालवण येथील नाथ पै सेवांगण सभागृह, धुरीवाडा येथे जिल्हा बँकेच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते सोसायटीचे चेअरमन सिताराम हडकर यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
श्री देव रामेश्वर सहकारी सोसायटी चिंदरने सलग पाच वर्षे जिल्हा बँकेच्या वतीने कौतुकास पात्र ठरत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कर्जदारांनी वेळेत कर्जाची परतफेड करावी, संस्थेची आर्थिक शिस्त कायम राहावी आणि सभासदांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा, यासाठी सोसायटीच्या पदाधिकारी व संचालक मंडळ, सोसायटी सचिव कविंद्र माळगांवकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे फलित मानले जात आहे. ग्रामीण भागातील सहकारी संस्थांनी आर्थिक शिस्त, पारदर्शकता आणि प्रभावी कर्जवसुली कशी साधावी, याचा श्री देव रामेश्वर सहकारी सोसायटी चिंदरने आदर्श निर्माण केला आहे.
या सत्कार सोहळ्यास सोसायटीचे सचिव कविंद्र माळगांवकर, संचालक, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक तसेच संबंधित पदाधिकारी उपस्थित होते. सलग पाच वर्षांची ही गौरवास्पद कामगिरी चिंदरच्या सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.












