तिरंग्याच्या अभिमानाने सावंतवाडी दुमदुमली; भाजपा सावंतवाडी विधानसभा यांच्या पुढाकारातून भव्य तिरंगा यात्रा उत्साहात

बांदा (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, पालकमंत्री नितेशजी राणे यांच्या सूचनेप्रमाणे भाजपा युवा नेते विशालजी परब तसेच या हर घर तिरंगा यात्रेचे जिल्हा संयोजक संदीप गावडे आणि भाजपा सावंतवाडी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांनी मिळून सावंतवाडी शहरात भव्य तिरंगा यात्रेच्या आयोजन केले होते. या यात्रेला नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत मोठ्या उत्साहात ही यात्रा संपन्न झाली.

प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण सावंतवाडी शहर देशभक्तीच्या उत्साहाने भारावून गेले.

यावेळी आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, तिरंगा यात्रा अभियान प्रमुख संदीप गावडे, नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, युवराज लखम राजे भोंसले, संजू परब, विक्रांत सावंत, सुदन कवठणकर, मायकल डिसोजा, महेश सारंग, भाजप शहराध्यक्ष तथा नगरपरिषद सभापती सुधीर आडीवरेकर, महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर यांच्यासह भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक-नगरसेविका, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी तिरंगा हा केवळ ध्वज नसून देशाचा स्वाभिमान, त्याग, शौर्य आणि एकतेचे प्रतीक आहे, असे सांगत विशाल परब यांनी प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून ‘हर घर तिरंगा, हर मन तिरंगा’ या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.

तिरंगा यात्रेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा सावंतवाडीकरांच्या देशप्रेमाची आणि राष्ट्रध्वजाप्रती असलेल्या अभिमानाची साक्ष ठरला.

error: Content is protected !!