विद्यार्थ्यांनी पोलिस-समाजातील दुवा बनावे : मोहन दहिकर

‘पोलीस दूत’ उपक्रमांतर्गत ४२ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण; अमलीपदार्थ, सायबर गुन्हे, वाहतूक व महिला सुरक्षेबाबत मार्गदर्शन

ओरोस (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांनी स्वतः सुरक्षित राहण्यासोबतच आपल्या मित्र-मैत्रिणी, शाळा-महाविद्यालये आणि समाजातही सुरक्षिततेबाबत जनजागृती करावी. विद्यार्थ्यांनी पोलिस आणि समाज यांच्यातील दुवा म्हणून काम करून सुरक्षिततेचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचवावा, अशी अपेक्षा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांनी व्यक्त केली.

पोलिस अधीक्षक दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या ‘पोलीस दूत’ संकल्पने अंतर्गत सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ११ शैक्षणिक संस्थांमधून निवडलेल्या ४२ पोलिस दूत विद्यार्थी व शिक्षकांना विविध विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले. सिंधुदुर्गनगरी येथील डॉन बॉस्को हायस्कूल येथे सोमवारी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत ही कार्यशाळा झाली.

सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये आणि आठ महाविद्यालयांमधून प्रत्येकी चार विद्यार्थ्यांची पोलिस दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना समाजातील विविध घटकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागृती करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात येत आहे. यावेळी अपर पोलिस अधीक्षक नायोमी साटम, डॉन बॉस्को हायस्कूलचे प्राचार्य केल्विन उपस्थित होते.

यावेळी पोलिस अधीक्षक दहिकर यांनी पोलिस दूत विद्यार्थ्यांशी संवाद साधून या संकल्पनेचा उद्देश, विद्यार्थ्यांची भूमिका आणि समाजात सुरक्षिततेचा संदेश पोहोचविण्याचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यशाळेत अमलीपदार्थांचे शरीरावर होणारे घातक परिणाम, अमली पदार्थां पासून दूर राहण्याचे उपाय, सायबर गुन्ह्यांचे प्रकार व त्यापासून बचाव, रस्ते नियमन व वाहतूक नियमांचे पालन तसेच महिलांविषयी होणाऱ्या अपराधांपासून बचाव या विषयांवर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे, जिल्हा वाहतूक शाखेच्या महिला पोलिस निरीक्षक आरिफा मुल्ला, भरोसा सेलच्या महिला सहायक पोलिस निरीक्षक नलिनी शिंदे आणि महिला पोलिस शिपाई धनश्री भोसले यांनी विविध विषयांवर प्रशिक्षण दिले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शेखर लव्हे, पोलिस हवालदार अमोल आखरे, पोलिस शिपाई राहुल कांबळे आणि महिला पोलिस शिपाई पावसकर यांनी प्रयत्न केले.

error: Content is protected !!