रमेश जामसंडेकर यांना ‘कोकण स्तरीय फोटोग्राफी पुरस्कार – २०२६ प्रदान
खारेपाटण (प्रतिनिधी) : क्रांती दिनाचे औचित्य साधून पत्रकार भवन,सिंधुनगरी येथे महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई आणि कोकण बुक ऑफ रेकॉर्ड्स फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोकण कला साहित्य गौरव संमेलन,पुस्तक प्रकाशन व सन्मान गौरव सोहळा’ अत्यंत उत्साहात पार पडला. या संमेलनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.यामध्ये खारेपाटण गावचे सुपुत्र तसेच छायाचित्र पत्रकार रमेश विष्णू जामसंडेकर यांना कोकण स्तरीय फोटोग्राफी पुरस्कार – २०२६ देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन करून या साहित्य गौरव संमेलनाचे उद्घघटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते करण्यात आले.या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून अतुल दिवे (ज्येष्ठ संगीतकार व गझलकार),
विजय चव्हाण (निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी),तुषार शिवशरण (राष्ट्रपती पुरस्कार विजेते – पर्यावरण पूरक स्मशानभूमी कार्य),श्रुती पारकर (सुप्रसिद्ध अभिनेत्री),दादा राणे -कोनस्कर (ज्येष्ठ दशावतार कलाकार),डॉ.विश्वास आरोटे (राज्य सचिव,पत्रकार संघ मुंबई),
प्रा.डॉ.बी.एन.खरात,ऋतुजा परब यांसह अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात खारेपाटण गावचे रमेश जामसंडेकर यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सातत्यपूर्ण उल्लेखनीय,प्रेरणादायी आणि समाजहितकारक कार्याची दखल घेऊन ‘कोकण स्तरीय फोटोग्राफी पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. सिंधुनगरी पत्रकार भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात श्री जामसंडेकर यांना सन्मानपत्र, मानचिन्ह,शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.अनेक क्षेत्रांत त्यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
या संमेलनात येथील लोककलेचा सन्मान करण्यात आला.तर सिंधुदुर्गातील महिला बचत गट,पारंपरिक दशावतारी कलाकार आणि भजनी मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.या
कार्यक्रमात कलाकारांसाठी मोठी घोषणा करण्यात आली.सुप्रसिद्ध संगीतकार व गझलकार अतुल दिवे यांनी आपल्या आगामी चित्रपटात दशावतार कलाकारांना काम करण्याची संधी दिली जाईल,अशी महत्त्वाची ग्वाही यावेळी दिली.
साहित्य आणि संस्कृतीचा संगम – कोकणातील कला, साहित्य आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे महत्त्व वक्तागणानी आपल्या मनोगतातून अधोरेखित केले.












