विजयदुर्ग-पाचल बससेवा पूर्ववत करा

पंचायत समिती सभेत मागणी; अन्यथा आंदोलन

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी बसस्थानकावरून सुटणारी विजयदुर्ग-पाचल बससेवा बंद असल्याने भुईबावडा-जांभवडे परिसरातील विद्यार्थी व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून ही बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करावी. अन्यथा आंदोलनाचा इशारा पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे यांनी दिला.
   
वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात झाली. यावेळी उपसभापती साची कोलते, सदस्य देवानंद पालांडे, मंगेश लोके, सुवर्ण संसारे, साधना नकाशे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ आदी उपस्थित होते. विजयदुर्ग-पाचल बससेवा बंद असल्यामुळे भुईबावडा-जांभवडे परिसरातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवास कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी सभेत करण्यात आली.

रस्त्याकडील झाडांच्या तोडीचा मुद्दा ऐरणीवर : तालुक्यातील रस्त्यांच्या कडेला सामाजिक वनीकरण विभागामार्फत सुमारे वीस वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या झाडांची सरसकट तोड केली जात असल्याचा मुद्दाही सभेत उपस्थित करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ धोकादायक झाडांचीच तोड करावी. मात्र, काही जण या कारवाईचा गैरफायदा घेत झाडांची राजरोसपणे कत्तल करीत आहेत. या झाडांचा नेमका फायदा कोण घेत आहे? तसेच या झाडांची मालकी नेमकी कोणाची आहे? असा सवाल सदस्य मंगेश लोके व देवानंद पालांडे यांनी उपस्थित केला.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील नुकसानीची भरपाई द्या : तालुक्यात वन्यप्राण्यांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना ठार मारण्याचे प्रकार वाढत आहेत. अशा घटनांमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळण्यासाठी वन विभागाने तातडीने प्रस्ताव पाठवावेत, अशी सूचना सभापती सिद्धेश रावराणे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.

स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांना माहिती द्या : स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी शासनाचा त्यासंदर्भातील नेमका शासन निर्णय (जीआर) काय आहे, याची माहिती ग्राहकांना देण्यात यावी. स्मार्ट मीटरमुळे विजेची बिले वाढत असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून येत आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या शंकांचे निरसन करूनच स्मार्ट मीटर बसविण्यात यावेत, अशी मागणी उपसभापती साची कोलते यांनी केली.

नवीन रेल्वेसेवेसाठी अभिनंदन : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी या कोकण रेल्वे मार्गावर नवीन रेल्वेसेवा सुरू करण्यास परवानगी मिळाल्याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांचे पंचायत समितीच्या सभेत अभिनंदन करण्यात आले. तसेच पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली.

error: Content is protected !!