आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाची युवा महोत्सवात चमकदार कामगिरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठ आयोजित ५९व्या युवा महोत्सवात वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळविले. भारतीय लोकनृत्य प्रकारात महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला, तर प्रहसन (स्किट) आणि रांगोळी या प्रकारांत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.

भारतीय लोकनृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक लोककलेचा आकर्षक आविष्कार सादर केला. आकर्षक वेशभूषा, तालबद्ध नृत्य, सांघिक सादरीकरण आणि प्रभावी नृत्याविष्कार यामुळे त्यांच्या सादरीकरणाला परीक्षकांची दाद मिळाली. प्रहसनातून विद्यार्थ्यांनी सामाजिक आशय प्रभावी अभिनय व संवादफेकीच्या माध्यमातून मांडला. तसेच रांगोळी स्पर्धेत कल्पकता, आकर्षक रंगसंगती आणि कलात्मकतेचा सुरेख मिलाफ साधत लक्षवेधी रांगोळी साकारण्यात आली. या यशामागे महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. राहुल भोसले यांच्यासह प्रा. दिनेश बेटकर, प्रा. निलेश कारेकर आणि डॉ. केशव पाखरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण आणि कार्यालयीन अधीक्षक संजय रावराणे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

error: Content is protected !!