कणकवलीतील जुगार कारवाईवर पालकमंत्री नितेश राणेंचा थेट इशारा

एकही अधिकारी – कर्मचारी सुटणार नाही

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील एका लॉजच्या मागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अंदर-बाहर जुगार अड्ड्यावर ११ ऑगस्ट रोजी कणकवली पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले होते. या कारवाईत १४ हजार ४०० रुपयांची रोकड व पत्ते जप्त केल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईचा पर्दाफाश करणारी व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कारवाईबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या प्रकरणाची थेट दखल जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे. ओरोस येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी संबंधित व्हिडिओ क्लिप आपण पाहिली असून, त्यातून धक्कादायक बाबी समोर आल्याचे सांगितले. घटनास्थळी सहा आरोपी असताना केवळ पाच आरोपी दाखविण्यात आले, तसेच कारवाईचे घटनास्थळही चुकीचे दाखविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. यातील कोणीही सुटणार नाही. कोणी कुठेही पळू दे. जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई होणारच; मात्र त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असा थेट इशारा नितेश राणे यांनी दिला. या घटनेची माहिती त्याच दिवशी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि अपर पोलिस अधीक्षक यांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जे अधिकारी – कर्मचारी त्यांना मदत करत होते, त्यातील एकही सुटणार नाही. आम्ही दोघेही स्पष्ट भूमिकेचे आहोत. या प्रकरणात कोणतीही तडजोड किंवा वशिलेबाजी चालणार नाही. जे कोणी मस्ती करत आहेत, त्यांच्यावर कारवाई होणारच, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, स्वतःचा बचाव करण्यासाठी संबंधितांची धावपळ सुरू झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील प्रत्यक्ष सहावा आरोपी कोण, घटनास्थळ चुकीचे का दाखविण्यात आले आणि कारवाईदरम्यान नेमके काय घडले, याबाबतच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!