कलमठ गावडेवाडी येथे शात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचा शैक्षणिक उपक्रम; विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : शिक्षणाच्या माध्यमातून समाजाची पुढची पिढी सक्षम आणि स्वावलंबी व्हावी, या उदात्त हेतूने कलमठ गावडेवाडी येथील शात्रकुलोत्पन्न मराठा (गावडा) समाजाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलमठ गावडेवाडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. समाजाच्या वतीने दरवर्षी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम राबविला जात असून, यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच ,लाेकप्रतिनिधी स्वप्निल चिंदरकर यांनी केले. यावेळी समाजातील ज्येष्ठ वडीलधाऱ्या व्यक्तींचे पपन विखाळे यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. उपस्थित ज्येष्ठांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व, सातत्याने अभ्यास करण्याची गरज आणि आयुष्यात मोठे ध्येय ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी जेष्ठ नागरीक अशाेक खाजनवाडकर, बांधकाम व्यावसायिक रामदास विखाळे, भानुदास चिंदरकर, बाबुराव चिंदरकर,भगवान रावले, भालचंद्र बांदिवडेकर,कांता आचरेकर यांच्या हस्ते विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

तसेच बँक ऑफ इंडियाचे निवृत्त अधिकारी रमेश चिंदरकर, शात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे मुंबई अध्यक्ष दीपक डगरे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कलमठ गावडेवाडीच्या मुख्याध्यापिका रश्मी आंगणे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

शिक्षणासाठी समाजाची सकारात्मक बांधिलकी

समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावण्याचा हा उपक्रम केवळ शालेय साहित्य वाटपापुरता मर्यादित नसून, ‘आपल्या समाजातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे’ या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. आर्थिक किंवा अन्य अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी समाजाने घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे.

शालेय साहित्याच्या रूपाने विद्यार्थ्यांच्या हातात केवळ वह्या-पुस्तके किंवा शैक्षणिक साधने देण्यात आली नाहीत, तर त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा आणि शिक्षणाच्या प्रवासात ‘तुम्ही एकटे नाही’ असा विश्वास देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. ज्येष्ठांच्या अनुभवाचे मार्गदर्शन आणि समाजाच्या सहकार्याची जोड मिळाल्यास विद्यार्थ्यांची नवी पिढी निश्चितच अधिक आत्मविश्वासाने पुढे जाईल.

आजच्या बदलत्या काळात समाजाच्या प्रगतीचा खरा पाया हा शिक्षणात आहे. त्यामुळे सामाजिक एकजूट,सहकार्य आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून दरवर्षी राबविण्यात येणारा हा उपक्रम समाजातील पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी आणि अनुकरणीय ठरत आहे.

यावेळी शात्रकुलोत्पन्न समाजातील विद्यार्थी व पालकवर्ग माेठ्या संख्येने उपस्थित हाेता.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे स्वप्निल चिंदरकर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!