स्वातंत्र्यदिनी बुधवळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केला थरारक मर्दानी खेळ..!

आचरा (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जि. प. शाळा बुधवळे नं. १ येथील विद्यार्थ्यांनी पारंपरिक मर्दानी खेळाचे दमदार व रोमांचक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.

विद्यार्थ्यांच्या अंगी शौर्य, आत्मविश्वास, शिस्त आणि देशभक्तीची भावना रुजावी, या उद्देशाने शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हजारें व सहकारी शिक्षक श्री. तळडेवकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. गेल्या नऊ दिवसांपासून आचरा येथील चंद्रकोर मर्दानी खेळ आखाड्याचे प्रशिक्षक वरद जोशी व हर्षद पेंडूरकर विद्यार्थ्यांना मर्दानी खेळाचे प्रशिक्षण देत आहेत.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लाठी-काठीसह विविध मर्दानी खेळांचे कौशल्यपूर्ण सादरीकरण करत उपस्थितांची वाहवा मिळवली. विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त आणि शिस्तबद्ध सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

यावेळी बुधवळे गावचे सरपंच श्री. पानवलकर, पोलीस पाटील श्री.कुवळेकर, अमोल चिंदरकर, शाळा समितीचे पदाधिकारी तसेच बुधवळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मर्दानी खेळाचे प्रशिक्षण पुढेही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असून, या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पारंपरिक खेळ आणि शौर्यकलेचे प्रशिक्षण मिळणार आहे अशी माहिती प्रशिक्षक वरद जोशी यांनी दिली.

error: Content is protected !!