कुडाळ (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आरोग्य व रक्त तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मानव साधन विकास संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’ या अॅम्ब्युलन्स सेवेचा शुभारंभ कुडाळ येथे उत्साहात पार पडला. ‘एक थेंब… एक आशा’ या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या सेवाभावी उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा अधिक सहज आणि सुलभपणे उपलब्ध होणार आहे.
कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कोकणभूमीचे सुपुत्र तथा माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, डॉक्टर तसेच संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी सुरेश प्रभू आणि उमा प्रभू यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत ‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या शुभारंभाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना बाळू देसाई यांनी सुरेश प्रभू यांच्या कार्याचे कौतुक केले. “कोकणभूमीचे सुपुत्र माजी केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू हे देशासाठी एक संपत्ती आहेत. देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेले उत्कृष्ट कार्य आणि त्यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. असे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आपल्या कोकणचे आहे, हे आपले भाग्य आहे,” असे त्यांनी सांगितले.
‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले. आरोग्यसेवा ही केवळ शहरांपुरती मर्यादित न राहता दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने ‘एक थेंब… एक आशा’ या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम अनेक गरजू नागरिकांसाठी आशेचा किरण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी, रक्त तपासणी यांसारख्या मूलभूत सुविधा गावातच उपलब्ध झाल्याने वेळ, प्रवास आणि खर्चाची बचत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मानव साधन विकास संस्थेचा हा उपक्रम आरोग्यसेवा जनसामान्यांच्या दारापर्यंत नेणारा महत्त्वपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम ठरणार आहे.












