वैभववाडी (प्रतिनिधी) : करूळ घाटात जांभा चिऱ्याची वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने रविवारी सकाळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
तरेळेहून कोल्हापूरच्या दिशेने जांभा चिऱ्याची वाहतूक करणारा ट्रक करूळ घाटात अचानक बंद पडला. ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने दोन्ही बाजूंच्या वाहनांना मार्ग काढताना अडथळा निर्माण झाला. परिणामी काही काळ वाहतूक कोंडी झाली.
घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच बंद पडलेला ट्रक तातडीने दुरुस्त करून मार्गस्थ करण्याच्या सूचना चालकाला दिल्या. काही वेळाने ट्रकची दुरुस्ती झाल्यानंतर तो मार्गस्थ करण्यात आला आणि घाटातील वाहतूक सुरळीत झाली.












