सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जल व मृद संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे ‘महा वॉकथॉन – Walk for Water 2026’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘चला, एक पाऊल पुढे टाकूया जल-मृद संवर्धनासाठी!’ या संदेशासह नागरिकांना या सामूहिक चालण्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा वॉकथॉन शुक्रवार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ग्राउंड, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग समोर येथे आयोजित करण्यात आला आहे.
‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ हा संदेश देत जलसंधारण, मृदसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. पाण्याची बचत, मातीचे संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी सामूहिक सहभागातून शाश्वत भविष्य घडविण्याचा संदेश या वॉकथॉनच्या माध्यमातून दिला जाणार आहे.
नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘चला, मिळून घडवूया शाश्वत भविष्य!’ या अभियानाला बळ द्यावे, असे आवाहन मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी पोस्टरवर दिलेल्या क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.












