सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जल व मृद संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागातर्फे ‘रील स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवक-युवतींनी जल व मृद संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवावा, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंवर्धन, जलसंवर्धन, मातीची धूप रोखणे, पावसाच्या पाण्याचे संकलन व पुनर्वापर, शेततळे, बंधारे व जलसंधारणाची कामे, पाणलोट क्षेत्र विकास, वृक्षारोपण व पर्यावरण संरक्षण, गावातील यशस्वी जल-मृद संवर्धनाची कामे आदी विषयांवर रील तयार करता येणार आहे.
स्पर्धेसाठी ३० ते ६० सेकंदांची रील तयार करणे आवश्यक असून, ती १५ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संबंधित सहभागीच्या पब्लिक Instagram अकाउंटवर अपलोड करायची आहे. रीलसोबत #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रीलसाठी स्टोरीटेलिंग, अभिनय, संगीत, नृत्य, अॅनिमेशन, AI क्रिएटिव्ह, कॉमेडी, शॉर्ट फिल्म, Before-After तसेच ड्रोन व्हिज्युअल्स यांसारख्या विविध सर्जनशील माध्यमांचा वापर करता येणार आहे.
जिल्हास्तरीय आकर्षक बक्षिसे
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहभागींसाठी जिल्हास्तरावर आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकासाठी २५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. विजेत्यांचा ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ म्हणून सन्मान करण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रथम विषय निवडून रील तयार करावी, त्यानंतर ती Instagram वर अपलोड करून नोंदणी व पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी. पोस्टरवरील QR कोड किंवा register.mahaevent.co.in या नोंदणी लिंकच्या माध्यमातून सहभाग नोंदविता येणार आहे.
‘एक रील… लाखो विचारांना जोडणारी! एक रील… सुरक्षित भविष्य घडवणारी!’ या संदेशातून युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जल व मृद संवर्धनाचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आले आहे.












