‘कचरा टाकू नये’च्या फलकाखालीच कचरा; गटारातील घाण वाहून रस्त्यावर

तरंदळे फाट्यावर दुर्गंधीचा त्रास

कणकवली (प्रतिनिधी) : ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’, ‘आपला परिसर स्वच्छ ठेवा’, ‘येथे कचरा टाकू नये’ असे संदेश देणारे फलक प्रशासनाकडून गावोगावी लावले जातात. मात्र, कणकवली तालुक्यातील जानवली ग्रामपंचायत हद्दीतील तरंदळे फाटा येथे या फलकांनाच जणू केराची टोपली दाखवली जात असल्याचे चित्र आहे. मुंबई-गोवा महामार्गापासून जवळ असलेल्या रस्त्याच्या कडेला परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात ओला-सुका कचरा, प्लॅस्टिक पिशव्या व अन्य घाण टाकली जात आहे.

पावसाळ्यामुळे रस्त्यालगतच्या गटारात साचलेला कचरा कुजून त्यातील घाण व दुर्गंधीयुक्त पाणी परिसरात पसरत आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांसह पादचाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. कचऱ्यामुळे परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला असून, नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, याच कचऱ्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या व इतर घातक वस्तूंचाही समावेश आहे. रस्त्यालगत फिरणारी गुरे-ढोरे हा कचरा खात असल्याने त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे एखाद्या जनावराचा कचरा खाल्ल्याने जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पावसाळा सुरू होण्यापूर्वीही याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. त्यावेळी कलमठ ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी हा कचरा जाळून टाकला होता. मात्र, सदर परिसर जानवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल्याने आता संबंधित प्रशासनाने तातडीने या समस्येकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावून परिसराची स्वच्छता करावी तसेच पुन्हा कचरा टाकला जाणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. स्वच्छतेचे फलक लावण्याबरोबरच त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!