जीवन आनंद संस्थेच्या आश्रमातील बांधवांची राष्ट्र ध्वज तिरंग्याला सलामी
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने अँक्यूप्रेशर द्वारे आरोग्य, आनंद आणि निरोगी जीवनाचा संकल्प
जीवन आनंद संस्थेच्या पालघर, सिंधुदुर्ग आणि गोव्यातील आश्रमात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
खारेपाटण (प्रतिनिधी) : “जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप परब आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची टीम समाजातील निराधार, वंचित, जखमी, आजारी बांधवांची मनापासून काळजी घेतात…अशा बांधवां ची घर, कुटुंबे शोधून त्यांना सुखरूप पुनर्मीलन घडवून आणतात. या संस्थेचे कार्य जवळून पाहिले. अनुभवले आणि त्यानंतर संस्थेच्या समर्थ आश्रमला अधिकाधिक लोकांचे सहाय्य मिळत राहावे यासाठी मी कार्य करीत आहे.” असे प्रतिपादन जीवन आनंद संस्थेच्या सक्रिय स्वयंसेवक आणि वसईतील श्री पालेश्वर देवस्थान ट्रस्ट पापडी च्या विश्वस्त अरुणाताई बापट यांनी केले.
संस्थेच्या विश्वस्त मंडळ सदस्यांच्या हस्ते यावेळी श्रीम.यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तर जीवन आनंद संस्थेच्या विरार फाटा येथील समर्थ आश्रमात ८० व्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रम प्रसंगी राष्ट्र ध्वजारोहन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.. तसेच संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक यांच्या हस्ते आणि संस्थापक संदिप परब यांच्या प्रमुख उपस्थितीत तर गोव्यातील मा आसरोघर (फोनडा) येथे जयेश व ज्योती कामत बांबोळकर, संवेदना आश्रम (पर्रा) येथे बिना चुरी, इनर व्हील क्लब तर स्नेहदिप आश्रम (नानोडा) येथे अमेय तेली, पारिश खानोलकर, संदेश बुर्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
विरार फाटा येथील कार्यक्रम प्रसंगी आश्रमातील बांधव आणि कार्यकर्त्यांसाठी आनंदयात्री संस्थेचे प्रमोद सुर्वे आणि अभय चव्हाण यांनी अॅक्यूप्रेशर उपचार पद्धती विषयी मार्गदर्शन केले. व स्वातंत्र्यदिना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रम निमित्ताने सर्व आश्रमांमध्ये ऍक्युप्रेशरचे ५ मंत्र/तंत्र नियमितपणे राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे आश्रमातील बांधवांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार असून हा संकल्प संस्थेच्या विश्वस्त अरुणा जगयासी यांनी यावेळी जाहीर केला असून, सर्व आश्रमांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
यावेळी अलका जोशी, प्रदीप लोखंडे,अविनाश इंगळे, कविता अडसुळे, सुरज मोरे, साक्षी सावंत यांचेसह संस्थेचे विश्वस्त अरुणा जगीयासी, नरेश चव्हाण, रामचंद्र अडसुळे, प्रज्ञा राणे व किसन चौरे हे उपस्थित होते. तर संपदा सुर्वे, दिपक अडसुळे, चंदा छेत्री, हेमलता पवार, मीना पटेल यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. संस्थेच्या विरार फाटा येथील जि.पालघर येथील समर्थ आश्रम सह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संविता आश्रम आणि गोव्यातील मु.ओपा खांडेपार फोंडा येथील मा आसरोघर आश्रम, पर्रा येथील संवेदना आश्रम आणि नानोडा येथील स्नेहदीप आश्रमांत देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला.














