खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

रानभाजी प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी जपली कोकणची पारंपरिक खाद्यसंस्कृती

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटण येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहपूर्ण, देशभक्तीमय आणि आनंदी वातावरणात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांच्या शुभहस्ते प्रशालेतील मुख्य राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त प्रशालेच्या परिसरात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणारे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव महेश कोळसुलकर, विश्वस्त विजय देसाई, योगेश गोडवे, प्रशांत गुळेकर, राजेंद्र वरूणकर, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी कांबळे सर, सर्व विश्वस्त, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप सर, पर्यवेक्षक संतोष राऊत, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून यावेळी प्रशालेच्या वतीने ‘रानभाजी प्रदर्शन’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी भेट दिली. तर विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध प्रकारच्या रानभाज्या, स्थानिक नभाज्या आणि पारंपरिक नखाद्यपदार्थांची माहिती सादर केली. कोकणातील ग्रामीण जीवनाशी आणि निसर्गाशी घट्ट जोडलेल्या रानभाज्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनातून जाणून घेतले. बदलत्या जीवनशैलीमुळे मागे पडत चाललेल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख नव्या पिढीला करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम विशेष महत्त्वपूर्ण ठरला. तर विद्यार्थ्यांनी रान भाज्यांची नावे, त्यांचे उपयोग, उपलब्धतेचा काळ तसेच त्यांचे आहारातील महत्त्व याबाबत माहिती संकलित करून ती प्रदर्शनात मांडली. त्यामुळे प्रदर्शनाला शैक्षणिक तसेच सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले.

रानभाजी प्रदर्शनाच्या आयोजनासाठी ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षिका कु.दर्शना पाताडे, माध्यमिक विभागातील कोकाटे मॅडम व अमृते मॅडम तसेच प्राथमिक विभागातील सर्व शिक्षिका आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना रानभाज्यांची माहिती संकलित करणे, त्यांचे सादरीकरण करणे आणि प्रदर्शनाची मांडणी करणे याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तर या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या निरीक्षणशक्ती, संशोधनवृत्ती, सादरीकरण कौशल्य आणि संघभावनेला चालना मिळाली. तसेच आपल्या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करण्याची जाणीवही यावेळी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली.

error: Content is protected !!