ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन २०२४-२५ चा प्रतिष्ठित जिल्हा युवक पुरस्कार निरवडे ग्रामपंचायतीचे सदस्य तथा अनुभव युवा मंचचे साथी जयराम जाधव, तर जिल्हा युवती पुरस्कार पब्लिक रिलेशन फाउंडेशनच्या संस्थापक तथा अनुभव युवा मंचच्या कार्याध्यक्ष फिजा मकानदार यांना प्रदान करण्यात आला. पालकमंत्र्यांच्या हस्ते दोघांचा सन्मान करण्यात आला.
युवा वर्गाला सामाजिक कार्याची दिशा देणे, युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे, सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती निर्माण करणे तसेच पर्यावरण, व्यसनमुक्ती, शिक्षण, संविधानिक मूल्ये आणि लोकसहभागाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
साथी जयराम जाधव यांनी युवकांच्या सहभागातून विविध सामाजिक उपक्रम राबविताना ग्रामपातळीवर युवा नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. युवकांना संघटित करून सामाजिक प्रश्नांवर सकारात्मक कृती करण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायत स्तरावरही युवकांचा सहभाग वाढविणे, स्थानिक प्रश्न समजून घेणे आणि लोकशाही प्रक्रियेत युवकांना सहभागी करून घेण्यासाठी त्यांचे योगदान राहिले आहे.
फिजा मकानदार यांनी युवक-युवतींच्या नेतृत्व विकासासाठी तसेच सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. पब्लिक रिलेशन फाउंडेशनच्या माध्यमातून युवकांमध्ये संवादकौशल्य, सामाजिक भान आणि नेतृत्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी त्यांनी काम केले आहे. अनुभव युवा मंचच्या माध्यमातून युवक-युवतींना सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे काम त्या सातत्याने करत आहेत.
पर्यावरण संवर्धन, जल-जंगल-जमीन संरक्षण, व्यसनमुक्ती, लैंगिक समानता, संविधान आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांसारख्या विषयांवर युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विविध अभियान व उपक्रम राबविण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. युवकांनी केवळ स्वतःच्या प्रगतीपुरते मर्यादित न राहता समाजाच्या विकासातही आपले योगदान द्यावे, या उद्देशाने त्यांचे कार्य सुरू आहे.
या पुरस्कारामुळे युवकांच्या सामाजिक कार्याला प्रोत्साहन मिळाले असून, “युवांनी पुढाकार घेतला तर समाजपरिवर्तनाची दिशा अधिक व्यापक होऊ शकते,” हा संदेशही या सन्मानातून अधोरेखित झाला आहे.
जयराम जाधव आणि फिजा मकानदार यांच्या या सन्मानाबद्दल अनुभव युवा मंच, पब्लिक रिलेशन फाउंडेशन तसेच विविध सामाजिक संस्था, युवा कार्यकर्ते आणि मित्रपरिवारातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












