पं. स. सदस्य देवानंद पालांडे यांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक
वैभववाडी (प्रतिनिधी) : केंद्रशाळा वि. मं. हेत येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले असून, शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. यावेळी श्री.पालांडे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट देऊन त्यांच्या यशाचे कौतुक केले.
यामध्ये कु. तनिष्का भानुदास बुराण (इयत्ता सातवी) हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. कु. आर्या उत्तम फोंडके (इयत्ता सातवी) हिने तालुक्यात सहावा क्रमांक मिळविला. तसेच कु. यश देवानंद फोंडके (इयत्ता चौथी) यानेही शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
यावेळी बोलताना देवानंद पालांडे म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. ग्रामीण भागातही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत आहे, याचा सार्थ अभिमान आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहेत. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना यापुढेही सर्वतोपरी मदत केली जाईल.”
यावेळी जि. प. शिक्षण समिती स्वीकृत सदस्य अनंत फोंडके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भानुदास बुराण, उपाध्यक्षा सौ. योगिता पांचाळ, व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष देवानंद फोंडके,उत्तम फोंडके, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक मुख्याध्यापक संतोष मोरे, उपशिक्षक हनुमंत गिते, उपशिक्षिका रूपाली कांबळे यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.












