बांदा (प्रतिनिधी) : नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा-काजू पिकांचे नुकसान झालेल्या मडुरा पंचक्रोशीतील पाडलोस, रोणापाल, मडुरा तसेच अन्य भागातील बहुतांश शेतकऱ्यांना शासनाकडून अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने पाडलोस विकास सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पंचनामे होऊन अनेक महिने उलटले, तसेच लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रियाही पूर्ण केली आहे. मात्र, भरपाईची रक्कम अद्याप खात्यावर जमा न झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शासनाने तत्काळ भरपाई द्यावी अशी मागणी नाईक यांनी केली आहे.
मडुरा पंचक्रोशीतील बहुतांश शेतकऱ्यांचे आंबा व काजू बागांचे नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले होते. शासनाच्या निर्देशानुसार संबंधित नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. त्यानंतर भरपाई मिळण्यासाठी आवश्यक असलेले आधार प्रमाणीकरणही शेतकऱ्यांनी पूर्ण केले. त्यामुळे आता भरपाई मिळण्याची प्रतीक्षा संपेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अनेक महिने उलटूनही काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही.
तहसीलदारांचे वेधले लक्ष
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी शासनाच्या मदतीवर मोठी अपेक्षा ठेवली असून, विलंबामुळे त्यांच्यात नाराजी वाढत आहे. प्रशासनाने प्रलंबित प्रकरणांची तातडीने तपासणी करून पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम तत्काळ वितरित करावी, अशी मागणी विश्वनाथ नाईक यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांचेही लक्ष वेधले असून, प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.












