रात्रौ 10 नंतर देखील खुलेआम गौण खनिज वाहतूक..! पोलीस प्रशासनाची साशंकित भूमिका ?
सुसाट डंपर मुळे होणाऱ्या अपघातांना वाली कोण ? मनसेचा सवाल
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परराज्यात होणाऱ्या गौण खनिज वाहतुकीबाबत सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या वेळेच्या निर्बंधांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे उघड होत असून रात्री 10 नंतर देखील खुलेआम अवैध वाहतूक होताना दिसत आहे. या वाहतुकीला पोलीस प्रशासनाकडून “सहकार्य” केले जात आहे की काय असा सवाल असून पोलिसांच्या एकूणच भूमिकेबाबत साशंकता उपस्थित होत आहे. महसूलचे अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे “मॅनेज” झाल्याची सर्वत्र चर्चा असून अलीकडेच जिल्ह्यात सुसाट डंपरमुळे घडलेले अपघात व त्यात झालेले मृत्यू पाहता लोकांच्या जिवापेक्षा वाळू चिऱ्यांनाच अधिक किंमत आहे असे दिसून येते. प्रशासकीय यंत्रणा एवढी हतबल होण्यामागे पालकमंत्री, आमदार,खासदार यांची जनतेप्रती असलेली अनास्था कारणीभूत असून सिंधुदुर्ग जिल्हा अक्षरशः पोरका झालेला भासत आहे. गुरुवारी मध्यरात्री गौण खनिज वाहतूक करणाऱ्या एका डंपरने धामापूर ते नेरूर दरम्यान एका इनोव्हा कार ला धडक दिल्याने संतप्त कर चालकाने व्हायरल केलेल्या व्हिडिओत मध्यरात्री होणाऱ्या गौण खनिज वाहतुकीचा पर्दापश झालेला आहे.सिंधुदुर्ग पोलिसांची सीसीटीव्ही यंत्रणा देखील कुचकामी ठरत असून सुसाट डंपर वाहतुकीमुळे जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी व अपघातात जखमी झालेल्या लोकांनी “न्यायासाठी” कोणाकडे अपेक्षा करावी अशी परिस्थिती निर्माण झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांनी गांभीर्यपणे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.










