वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आचरा तिठ्यावर पोलीस तैनात; वीज समस्या निवारणासाठी विद्युत अधिकाऱ्यांना खडे बोल
आचरा (प्रतिनिधी) : गणेशोत्सव हा उत्साहात साजरा करताना पर्यावरणाचे भान राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात व्यावसायिकांनी प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन आचरा ग्रामपंचायतीचे सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी केले. यावेळी त्यांनी वीज समस्यांबाबत उपस्थित विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत, गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठ्यात कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, आठवडा बाजाराच्या अनुषंगाने तसेच संपूर्ण गणेशोत्सव काळात संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायत आचरा यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत सभागृहात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला पोलीस प्रशासन, व्यापारी संघटना, रिक्षा संघटना, विद्युत मंडळ तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी व्यापाऱ्यांना प्लॅस्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन केले. गणेशोत्सव काळात बाजारपेठेत वाढणारी गर्दी लक्षात घेता पर्यावरणपूरक उपाययोजनांसोबतच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यावरही भर देण्यात आला.
आचरा तिठ्यावर पोलिसांची तैनाती
गणेशोत्सव काळात आचरा तिठ्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी होमगार्डसोबत पोलिसांचीही तैनाती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे फलक अथवा बोर्ड लावू नयेत, याबाबत व्यापाऱ्यांना सूचना देण्याचे ठरले.
एसटी बस थांब्याजवळ खासगी वाहने पार्क केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, यासाठीही विशेष दक्षता घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सव काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन व ग्रामपंचायतीच्या समन्वयातून उपाययोजना करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
यावेळी उपसरपंच संतोष मिराशी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम पडवळ, ग्रामविकास अधिकारी पद्माकर कासले, आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, मंदार सांबारी, जयप्रकाश परुळेकर, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, चंदू कदम, पूर्वा तारी, सायली सारंग, विद्युत मंडळाचे सहाय्यक अभियंता शिंदे, कर्मचारी पिंट्या साळकर, मंगेश परब, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, विठ्ठल धुरी, रिक्षा संघटनेचे संजय आचरेकर, श्रीपाद वायंगणकर, तसेच मिराशी, भाटकर, ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.











