महिला बालविकास सभापती अनुराधा नारकर यांच्या हस्ते उदघाटन
कणकवली (प्रतिनिधी) : बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांच्या आरोग्यासाठी पोषण आहाराचे महत्त्व अधोरेखित करत एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) प्रकल्प कणकवली यांच्या वतीने राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत ‘पोषण माह’ विशेष जनजागृती कार्यक्रम वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्साहात संपन्न झाला. कुपोषणमुक्त समाज निर्माण करण्यासह माता व बालकांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी कणकवली पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके आणि उपसभापती सोनू सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर म्हणाल्या, सुदृढ बालक हे निरोगी कुटुंब आणि सुदृढ समाजाचा पाया आहे. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या आहारात आवश्यक पौष्टिक घटक योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. अंगणवाडी स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध पोषण योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
उपसभापती सोनू सावंत यांनी ग्रामीण भागातील माता व बालकांच्या आरोग्याबाबत सातत्याने जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली. शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आरोग्य आणि पोषणाशी संबंधित विविध योजना राबविल्या जात असून, ग्रामस्थांनी या उपक्रमांना सक्रिय सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, वरवडे सरपंच करुणा घाडीगावकर, उपसरपंच अमोल बोंद्रे तसेच वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली वळंजू यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी स्थानिक अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा स्वयंसेविका, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, माता तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोषण आहार, माता-बालकांचे आरोग्य आणि कुपोषण प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. ‘सुदृढ बालक, सुदृढ कुटुंब आणि कुपोषणमुक्त समाज’ हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.











