कट्टा संघावर मात करत पटकावले विजेतेपद; जिल्हास्तरीय स्पर्धेत मालवण तालुक्याचे करणार प्रतिनिधित्व
आचरा (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मालवण तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२६-२७ मध्ये मालवण शहरातील रोझरी इंग्लिश स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलांच्या कबड्डी संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपदावर नाव कोरले.
रोझरी इंग्लिश स्कूलच्या संघाने अंतिम सामन्यात कट्टा संघावर मात करत तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या शानदार विजयामुळे रोझरी इंग्लिश स्कूलचा संघ आता जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेत केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोझरी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांच्यासह संपूर्ण शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पालकांनी विजयी संघाचे अभिनंदन केले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, संघाच्या या यशामध्ये प्रशिक्षक जेरी फर्नांडिस, सक्रिय हितचिंतक जेवी फर्नांडिस तसेच मार्गदर्शक व सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि खेळाडूंच्या अथक मेहनतीमुळे रोझरी इंग्लिश स्कूलच्या संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला.
तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने रोझरी इंग्लिश स्कूलच्या या युवा कबड्डीपटूंकडून आता जिल्हास्तरीय स्पर्धेतही दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.












