रस्त्यात सापडलेला मोबाईल केला मूळ मालकाच्या स्वाधीन!

पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांच्या प्रामाणिकपणाचे मसुरे परिसरातून कौतुक; मोबाईल मिळताच वयोवृद्धाच्या डोळ्यांत आनंदाश्रू

आचरा (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात माणुसकी आणि प्रामाणिकपणाची उदाहरणे दुर्मीळ होत असताना मसुरे येथील पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी आपल्या कृतीतून माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. मसुरे बाजारपेठेतील रस्त्यावर पडलेला मोबाईल त्यांना सोमवारी सापडला होता. संबंधित मोबाईल हा मसुरे देऊळवाडा येथील वयोवृद्ध ग्रामस्थ मोहन परब यांचा असल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्यांचा शोध घेतला.

बुधवारी सकाळी पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी कोणताही विलंब न करता सदर मोबाईल त्याचे मूळ मालक मोहन परब यांच्याकडे प्रामाणिकपणे सुपूर्द केला.

मोहन परब यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने मोबाईल हरवल्याने त्यांना मोठी चिंता लागून राहिली होती. मात्र, हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मोबाईल हातात मिळताच त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.

यावेळी वयोवृद्ध मोहन परब यांनी पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. पेडणेकर यांच्या या माणुसकीच्या कृतीचे मसुरे परिसरातूनही कौतुक होत आहे.

हरवलेली वस्तू परत करून पेडणेकर यांनी ‘माणुसकी अजूनही जिवंत आहे’ याचा प्रत्यय दिला असून, त्यांच्या या प्रामाणिकपणाची परिसरात चर्चा होत आहे.

error: Content is protected !!