मुलांना ‘सुरक्षित’ आणि ‘असुरक्षित स्पर्शा’तील फरक समजावून सांगा

पोक्सो कायद्याबाबत आंब्रड येथे मार्गदर्शन

ओरोस : (प्रतिनिधी) : मुलांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नसून पालक, शिक्षक आणि समाजानेही सजग राहणे आवश्यक आहे. मुलांशी नियमित संवाद साधून त्यांना ‘सुरक्षित स्पर्श’ आणि ‘असुरक्षित स्पर्श’ यातील फरक समजावून सांगावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंब्रड येथील श्री भगवती देवी माध्यमिक विद्यालयात ‘बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण अधिनियम २०१२’ (पोक्सो) या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली, पॅनल विधीज्ञ ॲड. आशपाक शेख, अधीक्षक एस. डी. गिरकर तसेच विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते.

ॲड. शेख यांनी पोक्सो कायद्यात मुली आणि मुले अशा सर्व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करण्यासाठी कठोर तरतुदी असल्याचे सांगितले. लैंगिक छळ, छेडछाड, अश्लील वर्तन आणि अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करणे हा या विशेष कायद्याचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोक्सो कायद्याची माहिती विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी जाणून घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सचिव नडगदल्ली यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शातील फरक समजावून सांगितला. आपल्यासोबत चुकीचे अथवा अस्वस्थ करणारे काही घडल्यास ते लपवून न ठेवता पालक, शिक्षक अथवा विश्वासू व्यक्तीला त्वरित सांगावे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच नागरिकांची मूलभूत कर्तव्ये आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या मोफत कायदेविषयक सेवा व सहाय्याची माहितीही त्यांनी दिली.

error: Content is protected !!