कत्तलीसाठी गुरांची अवैध वाहतूक; दोन टेम्पो पकडले

सात जणांवर वैभववाडी पोलिसांत गुन्हा

वैभववाडी (प्रतिनिधी) : कत्तलीसाठी गुरांची अवैधरित्या वाहतूक करणारे दोन टेम्पो वैभववाडी पोलिसांनी भुईबावडा घाटात पकडले. या कारवाईत दोन चालकांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.गोरक्षक मंगेश पडवळ यांनी दिलेल्या माहितीनुसार वैभववाडी पोलिसांनी भुईबावडा घाटात गगनबावडा हद्दीजवळ सापळा रचला. यावेळी भुईबावड्याहून निपाणीच्या दिशेने जाणारा टेम्पो पोलिसांनी अडविला. टेम्पोच्या हौद्यात दाटीवाटीने पाच बैल आढळून आले.
या प्रकरणी चालक मंदार संजय पाटणकर (रा. कुंभवडे ब्राह्मणवाडी, ता. राजापूर), विनायक मोहन भोईटे, टेम्पो मालक वसीम सोलापूर (रा. निपाणी), गुरांचा मालक मोहम्मद अली दाऊद काजी उर्फ पांड्या (रा. तळगाव, ता. राजापूर) व त्यांना मदत करणारा शब्बीर भेरी, व नवाज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पहिल्या टेम्पोची चौकशी सुरू असतानाच दुसरा टेम्पो पोलिसांनी अडविला. चालक-मालक सर्जेराव सदाशिव सावंत यांच्या ताब्यातील या टेम्पोत दोन बैल व तीन पाडे होते. शेतीच्या कामासाठी जनावरे नेत असल्याचे सांगण्यात आले; मात्र त्यांच्याकडे वाहतूक परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलीस किरण मेथी, पोलीस हवालदार रंजीत सावंत व पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र यांनी केली.

error: Content is protected !!