कणकवली (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यामंदिर नाटळ येथे सावंत फाऊंडेशन, कळसुली सेंटर यांच्या वतीने, नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई आणि बॉम्बे असोसिएशन फॉर सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Test Your Experimental Skill’ ही आगळीवेगळी प्रात्यक्षिक विज्ञान कौशल्य कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
विज्ञान म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील धडे वाचणे, पाठांतर करणे आणि परीक्षेत उत्तरे लिहिणे नव्हे, तर प्रश्न विचारणे, निरीक्षण करणे, प्रयोग करणे, चुका शोधणे, माहितीचे विश्लेषण करणे आणि स्वतः निष्कर्ष काढणे, हा वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता.
या कार्यशाळेसाठी नाटळ गावचे सुपुत्र अनिल सावंत (बापू सावंत) यांनी अर्थसाहाय्य केले. तसेच कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन, सूत्रसंचालन आणि विद्यार्थ्यांना प्रयोगांची सविस्तर माहिती देण्याची जबाबदारी विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली येथील विज्ञान शिक्षिका शर्मिला केळुसकर मॅडम यांनी प्रभावीपणे पार पाडली. त्यांना किशोर तेली सर, कनेडी कॉलेज; भक्ती आर्डेकर मॅडम, विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, कणकवली; तसेच राजेंद्र तवटे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
ही पारंपरिक लेखी परीक्षा नसून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान समजून घेण्याची संधी देणारी चाचणी होती. विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग स्वतः करून पाहिले, निरीक्षणे नोंदवली, “हे असे का झाले?” या प्रश्नाचा विचार केला आणि त्यावर आधारित निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला.आजच्या स्पर्धात्मक युगात NEET, JEE, MHT-CET यांसारख्या परीक्षांसाठी केवळ पाठांतर पुरेसे नसून संकल्पना समजून घेणे, निरीक्षणशक्ती, विश्लेषणक्षमता, समस्या सोडविण्याची क्षमता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ही कौशल्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. याच दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता, आत्मविश्वास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
“प्रयोगाला घाबरू नका, प्रयोगातून शिका! प्रश्न विचारायला घाबरू नका, कारण प्रश्नातूनच विज्ञान जन्माला येते. चूक झाली तरी थांबू नका; कारण प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी नवीन शिकवते,” हा संदेश या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना देण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माध्यमिक विद्यामंदिर नाटळच्या मा. मुख्याध्यापिका बांबुळकर मॅडम, शिक्षकवृंद, शर्मिला केळुसकर मॅडम, राजेंद्र तवटे सर, किशोर तेली सर, भक्ती आर्डेकर मॅडम तसेच सर्व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
“पुस्तकातील विज्ञान प्रयोगशाळेत आणा, प्रयोग करा, निरीक्षण करा आणि स्वतःचा निष्कर्ष स्वतः काढा,” हा या उपक्रमाचा संदेश विद्यार्थ्यांच्या मनावर ठसला.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सावंत फाऊंडेशनच्या वतीने सर्व सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले सावंत फाऊंडेशनच्या वतीने अशा प्रकारच्या प्रात्यक्षिक व कौशल्याधारित कार्यशाळा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्याचा मानस आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रयोगशीलता, निरीक्षणशक्ती आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
यासोबतच सावंत फाऊंडेशनच्या वतीने मूर्तिकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात येत आहे. शिवडाव हायस्कूल आणि भडगाव हायस्कूल येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, कळसुली, आंब्रड आणि नाटळ येथील हायस्कूलमध्येही लवकरच मूर्तिकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, भारतीय मूर्तिकलेची समृद्ध परंपरा जपणे आणि विद्यार्थ्यांना मातीशी जोडणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या शैक्षणिक व सर्जनशील उपक्रमांचा विस्तार अधिकाधिक शाळांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था व हितचिंतकांनी पुढे येऊन सावंत फाऊंडेशनच्या या उपक्रमांना आर्थिक तसेच आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन सावंत फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. आपल्या छोट्याशा योगदानातून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी मोठे योगदांत देता येईल.
संपर्क करण्यासाठी
श्रीकृष्ण महादेव सावंत
सचिव सावंत फाऊंडेशन कळसुली
मोबाईल नंबर 9420822230














