शिवसेना उपजिल्हाप्रमुखाच्या घरात सापडले गांज्यासह आणखी अंमली पदार्थ

सिद्धेश उर्फ भाई परब अटकेत ;वेंगुर्ले पोलिसांची कारवाई

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या विळख्याविरोधात पोलिसांनी थेट अॅक्शन मोड स्वीकारत आज एक मोठी धडक कारवाई केली आहे. शिरोडा येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या घरावर पोलिसांनी अचानक छापा टाकला. या झाडाझडतीत त्याच्या घरातून गांजा आणि कोकेनसदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आला.

पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याच्या घरातच अमली पदार्थ सापडल्याने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी ‘नशामुक्त सिंधुदुर्ग’ हे अभियान हाती घेतले आहे. जिल्ह्यातील अमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि ड्रग्जचे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचे कडक निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधात तपास तीव्र केला होता. शिरोडा येथे राहणाऱ्या सिद्धेश परब याच्या घरात अमली पदार्थांचा साठा ठेवल्याची खात्रीशीर गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज सकाळी पोलिसांनी परब यांच्या घरावर छापा टाकला.
या कारवाईदरम्यान घरात ठेवलेल्या एका बॅगेची कसून तपासणी केली असता, गांजा आणि कोकेनसदृश अमली पदार्थ मिळून आले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून सिद्धेश परब याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईबाबत वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी अधिकृत माहिती दिली असून संशयितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शिवसेनेच्या एका प्रमुख पदाधिकाऱ्याच्या घरात हे अमली पदार्थ नेमके आले कुठून, ते विक्रीसाठी ठेवले होते की सेवनासाठी, आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे, याचा कसून शोध पोलीस घेत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः ‘ऑन फिल्ड’ उतरून धडक कारवाया करत असल्याने अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले असून, या प्रकरणाच्या सखोल तपासाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!