समाजाचे देणे आणि पत्रकारिता नाण्याच्या दोन बाजू – गणेश इस्वलकर
सामाजिक भान आणि विकसित तंत्रज्ञान यामुळे पत्रकारितेत करिअरची संधी – राजेश शिरोडकर
फोंडाघाट महाविद्यालयात ‘पत्रकार–विद्यार्थी संवाद’ कार्यक्रम उत्साहात संपन्न !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील विद्यार्थी मंडळ विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना पत्रकारिता व प्रसारमाध्यमांच्या क्षेत्राची ओळख व्हावी, तसेच पत्रकारांच्या प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने ‘पत्रकार–विद्यार्थी संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे चेअरमन महेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी मंडळ विभागाचे प्रमुख डॉ. बालाजी सुरवसे यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजना मागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाल्यास त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींशी संवादातून विद्यार्थ्यांना प्रसारमाध्यमांची भूमिका, पत्रकारितेतील आव्हाने तसेच या क्षेत्रातील विविध संधी समजण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे चेअरमन मा. श्री. महेश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मा. श्री. गणेश जेठे, कणकवली तालुका पत्रकार संघाचे सचिव मा. श्री. संजय सावंत, दैनिक पुढारीचे उपसंपादक मा. श्री. तुषार नेवरेकर, दैनिक सकाळचे पत्रकार मा. श्री. गणेश इसवलकर, लाईव्ह महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे मा. श्री. राजेश शिरोडकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गणेश जेठे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला तसेच फोंडाघाट परिसराला पत्रकारितेचा मोठा इतिहास असल्याचे सांगितले. मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी, भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी तसेच समाजातील विविध समस्या शासन आणि प्रशासनाच्या निदर्शनास आणून त्या सोडविण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पत्रकारिता म्हणजे काय, पत्रकारितेचा इतिहास आणि लोकशाही व्यवस्थेतील प्रसारमाध्यमांचे महत्त्व याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. “आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या देशावर प्रेम करून सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले. पत्रकारितेतील विविध आव्हाने व संधी यांची माहिती देताना शाश्वत विकास डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.
संजय सावंत यांनी पत्रकारिता हे दुधारी शस्त्र असल्याचे सांगून पत्रकारांनी वास्तविकता आणि सत्यता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे स्पष्ट केले. पत्रकारांनी समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.महाविद्यालयांनी विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी झालेल्या व्यक्तींशी विद्यार्थ्यांचा वारंवार संवाद घडवून आणला, तर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्यास आणि त्या क्षेत्रात यशस्वी होण्यास निश्चितच मदत होईल, असेही त्यांनी सांगतले.
गणेश इसवलकर यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध अभ्यासक्रमांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करावा, असे आवाहन केले. “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो,” या भावनेतून पत्रकारिता करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारितेमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून, पत्रकारांनी निर्भीडपणे आणि जबाबदारीने पत्रकारिता करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तुषार नेवरेकर यांनी विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून घ्यावी, भाषेचे आणि व्याकरणाचे ज्ञान आत्मसात करावे, तसेच इतर भाषांचेही ज्ञान मिळवावे, असे सांगितले. समाजामध्ये घडणाऱ्या विविध घटनांकडे केवळ वरवर न पाहता त्यामागील कारणांचा विचार करून चिंतन करण्याची सवय विद्यार्थ्यांनी विकसित करावी, असे आवाहन त्यांनी केले.
पत्रकार राजेश शिरोडकर यांनी बदलत्या काळानुसार पत्रकारितेचे स्वरूपही बदलत असल्याचे सांगितले. आधुनिक प्रसारमाध्यमांचा प्रभाव वाढत असताना पत्रकारांनी नव्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याबरोबरच बातमीची सत्यता पडताळणे, वस्तुनिष्ठता जपणे आणि सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी बदलत्या माध्यमविश्वाचा अभ्यास करून आपल्या कौशल्यांचा विकास करावा, असेही त्यांनी सांगितले..
फोंडाघाट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्रातील विविध संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पत्रकारितेशी संबंधित अभ्यासक्रम व उपक्रम आयोजित करण्याचा महाविद्यालयाचा मानस आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या विशेष सत्रात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थित पत्रकारांना पत्रकारिता क्षेत्रातील आव्हाने, करिअरच्या संधी, बातमी लेखन, पत्रकारितेतील नैतिकता, प्रसारमाध्यमांची जबाबदारी, बदलते तंत्रज्ञान आणि पत्रकारितेतील अनुभव यासंदर्भात विविध प्रश्न विचारले. उपस्थित पत्रकारांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सविस्तर आणि समाधानकारक उत्तरे देत आपल्या अनुभवांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन मा. श्री. महेश सावंत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, लोकशाही व्यवस्थेत पत्रकारितेला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून समाजातील घडामोडी, समस्या आणि जनतेचे प्रश्न प्रभावीपणे समाजासमोर मांडण्याचे कार्य पत्रकार करीत असतात. पत्रकारांनी सत्य, वस्तुनिष्ठता आणि सामाजिक बांधिलकी यांना प्राधान्य देऊन आपली भूमिका पार पाडणे आवश्यक आहे. आजच्या बदलत्या काळात पत्रकारितेचे स्वरूपही मोठ्या प्रमाणात बदलत असून विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील नव्या संधींचा अभ्यास करावा. महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन, निरीक्षण आणि चिकित्सक विचार करण्याची सवय लावून घ्यावी. अशा संवादात्मक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच भविष्यातील करिअरसाठीही दिशा मिळते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतीश कामत यांनी केले, तर प्रा. विनोदसिंह पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.












