रंग- शिल्प शाळेत, पंचक्रोशीतील बाप्पाच्या मूर्तीवर अखेरच्या कलाकारीला वेग !
पिळणकरांचा फ्रुट स्टॉल ठरतोय लक्षवेधी !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : पंचक्रोशीतील वाड्या- वाड्यावर मूर्ती- कला शाळांमध्ये गणपती बाप्पाच्या शिल्पावर अखेरचा हात आणि मनमोहक लिखाई तसेच कलाकारीला वेग आला आहे. त्या ठिकाणी सर्व कलाकारांची लगबग पहावयास मिळत आहे. लोरे नंबर २ येथील डोंगरे- मांजलकर यांच्या जुन्याजाणत्या रंग शाळेत आता नव्या युवाईची कलाकारी बाप्पांचे मनोहर रूप साकारत आहेत. सोनाळी हायस्कूल मधिल आर्ट शिक्षिका कु. मयुरी आपले वडील सुरेश आणि भाऊ,तसेच नातेवाईकांच्या मदतीने हुबेहुब जिवंत शिल्पाचा अविष्कार साकारत आहेत. पंचक्रोशीतील विविध वाड्यावर कित्येक रंगशाळांमध्ये अखेरच्या कामात सर्वजण धुंद आहेत…
बाजारपेठेत मकराच्या माळा,गोंडे, मण्यांचे हार, कृत्रिम फुलांचे हार, तयार मखरे, लाकडी मंडपी, सुपे, सुपल्या, मंडपीचे कांगले, बेडे, हरणे ,कौंडाळे इत्यादी तसेच ध्वनी सिस्टीम्स, विद्युत रोषणाई साहित्य विक्रीची दुकाने गजबजली आहेत. तर किराणा मालाची दुकाने घर सामानाने खचाखच भरली असून, तेथे ग्राहकांची विशेष गर्दी आहे. एखादे टाळ, मृदंग, नाल च्या दुरुस्तीच्या दुकानातून येणारे स्वर गणेश सोहळ्याच्या आगमनाची साक्ष देत आहे. नवीन पोशाख, पडदे, रंग, लेस, उपरणे, धोतर यांची रंगीबेरंगी दुकाने सजली आहेत. त्यातच स्टॅन्ड समोरील अनंत व नाना पिळणकर यांचा फ्रुट स्टॉल आणि त्यांची मनमोहक मांडणी सर्वांचे आकर्षण ठरत आहे…
आपले आराध्य विघ्नविनाशक गणरायाच्या स्वागताला कोकणवासीयांसह वाडी- वाडी वरील फोंडावासिय तसेच येऊ घातलेले चाकरमानी सज्ज झाले आहेत. मात्र वाढती महागाई आणि पगार- मिळकतीचे गणित व्यस्त असल्याने, किंबहुना जुळत नसल्याने, ग्राहकांनी सण साजरा करताना हात आखडता घेतला आहे. त्यामुळे बाजारपेठेत मालाची रेलचेल असूनसुद्धा खरेदी शास्त्रापुरतीच किंवा कमी प्रमाणात होत असल्याने व्यापारी चिंतेत आहेत. तरीही बाप्पाच्या उत्सवाला पारंपारिक भजनाची जोड देऊन अबाल वृद्ध- युवाई मध्ये उत्साह ओसंडत आहे….













