ज्या शाळेने घडविले, त्या शाळेच्या विकासासाठी छोटेसे योगदान
SSC 2016-17 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा कौतुकास्पद उपक्रम; शाळेच्या विकासासाठी 40 हजारांची देणगी!
कणकवली (प्रतिनिधी) : हरकुळ बुद्रुक येथील समता सेवा संघ संचलित लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय व अशोक मधुकर पावसकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या SSC 2016-17 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी ४० हजार रुपयांचा धनादेश प्रशालेकडे सुपूर्द केला. प्रशालेतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने IBT (Introduction to Basic Technology) लॅबसाठी ही देणगी देण्यात आली. आपल्या शाळेने दिलेल्या शिक्षणाची आणि घडवलेल्या संस्कारांची जाणीव ठेवून माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या विकासासाठी केलेले हे योगदान कौतुकास्पद आहे. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेच्या विकासासाठी दिलेल्या या मदतीमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांना हातभार लागणार आहे. माजी विद्यार्थ्यांनी शाळेशी असलेले ऋणानुबंध जपत भविष्यातही शाळेच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.
प्रशाळेच्या वतीने उपस्थित माजी विदयार्थ्यांना सन्मान करण्यात आला. व शिक्षण वृंदाकडून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी गिरीश घाडीगावकर व उद्धव पारकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी SSC 2016-17 बॅचचे माजी विद्यार्थी उद्धव पारकर, समीर गुरव, गिरीश घाडीगावकर, सोनाली सापळे, गौरी घाडीगावकर उपस्थित होते. तसेच शालेय समितीचे चेअरमन डॉ. सुहास पावसकर, शालेय समिती सदस्य बाबासाहेब वर्देकर, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नवाळे मॅडम, सुमन तांबे मॅडम, डोंबाळे सर, हरकुळकर मॅडम, सुप्रिया तांबे मॅडम, स्वप्नील वर्देकर सर, उज्वला पावसकर यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
माजी विद्यार्थ्यांच्या या योगदानाबद्दल प्रशालेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले.












