राष्ट्रीयकृत बँकांच्या संपाचा गणेशभक्तांना फटका

एटीएम बंद असल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी; गणेशोत्सवाच्या खरेदीवर परिणाम

वैभववाडी (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असतानाच शुक्रवारी एक दिवसाचा संप तर शनिवारी, रविवार, सोमवार सुट्टी त्यामुळे सलग चार दिवस बँक बंद असल्याचा  फटका नागरिकांना बसत आहे. बँकांचे व्यवहार सलग चार दिवस  बंद राहिल्याने आणि काही ठिकाणी एटीएम सेवाही बंद असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. ऐन सणासुदीच्या काळात पैशांची गरज असताना रोख रक्कम काढण्यासाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे आदी शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे दाखल झाले आहेत. गणेशमूर्ती, पूजासाहित्य, फुले, फळे, मिठाई, सजावटीच्या वस्तू तसेच घरगुती साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी वाढली आहे. मात्र,  एटीएम सेवा बंद असल्याने रोख रकमेची आवश्यकता असलेल्या नागरिकांची चांगलीच अडचण झाली.

गणेशोत्सवाच्या काळात घरगुती खरेदीबरोबरच प्रवास, गणेशमूर्ती, सजावट आणि पूजासाहित्य यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. त्यामुळे ऐन सणाच्या काळात सलग चार दिवस बँक व्यवहार बंद राहणार असल्याने नागरिकांना उपलब्ध रोख रकमेवरच अवलंबून राहावे लागले. बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम केंद्रांवर सेवा उपलब्ध नसल्याने काही नागरिकांना इतर ठिकाणी जाऊन पैसे काढण्याची वेळ आली.

सणासुदीच्या काळात गैरसोय..
गणेशोत्सवासाठी गावाकडे आलेल्या चाकरमान्यांची संख्याही मोठी आहे. अनेक नागरिक विविध शहरांतून आल्यानंतर स्थानिक पातळीवर खरेदीसाठी डिजिटल व्यवहारांबरोबरच रोख रकमेचा वापर करतात. मात्र, एटीएम सेवा बंद असल्याने अचानक पैशांची गरज भासलेल्या नागरिकांची पंचाईत झाली. सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!