पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सामाजिक उपक्रमाचे कौतुक; ‘कर्मचाऱ्यांचे कैवारी तुम्हीच होऊ शकता’ अशी व्यक्त केली भावना
फोंडाघाट (प्रतिनिधी) : येथील चेकपोस्टवर आज सामाजिक कार्यकर्ते अजित राधाकृष्ण नाडकर्णी यांच्या वतीने पोलीस कर्मचारी तसेच इतर कर्मचाऱ्यांसाठी शुद्ध पाण्याचे वाटप करण्यात आले. उन्हात तसेच प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पोलीस विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
अजित नाडकर्णी हे लॉकडाऊनच्या काळापासून कर्मचाऱ्यांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत असून, त्यांच्या या सेवाभावी कार्याचे यावेळी उपस्थितांनी विशेष कौतुक केले. ‘खऱ्या अर्थाने कर्मचाऱ्यांचे कैवारी तुम्हीच होऊ शकता,’ अशा शब्दांत कर्मचाऱ्यांनी नाडकर्णी यांच्या कार्याचे गौरवोद्गार काढले.
यावेळी बोलताना अजित नाडकर्णी म्हणाले की, “हा उपक्रम आमदार निलेश राणे आणि माझे मित्र संजय आग्रे यांच्या सहकार्यामुळे शक्य झाला. कर्मचाऱ्यांसाठी भविष्यातही असे उपक्रम सुरू ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील.”
फोंडाघाट चेकपोस्टवर कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा हा उपक्रम ठरला असून, सामाजिक बांधिलकी जपत नाडकर्णी यांनी केलेल्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.











