आचरा (प्रतिनिधी) : वायंगणी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या सेवाकार्यात मोलाचे योगदान देणारे मसुरे गावचे सुपुत्र व प्रसिद्ध उद्योजक डॉ. श्रीकृष्ण (दीपक) परब यांनी मठाला संगणक संच व प्रिंटर भेट देत सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या या दातृत्वपूर्ण योगदानाबद्दल मठ व्यवस्थापनाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपक सुर्वे होते. यावेळी कार्याध्यक्ष चंद्रकांत (बाबू) हडकर, पंडित खोत, कल्याण साळकर, दिनेश साळकर, प्रफुल्ल माळकर, रूपेश राणे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना कार्याध्यक्ष चंद्रकांत (बाबू) हडकर यांनी डॉ. परब यांच्या सामाजिक व धार्मिक योगदानाचे कौतुक केले. ते म्हणाले, “डॉ. दीपक परब हे सामाजिक बांधिलकी जपणारे संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. स्वामी समर्थ मठावर त्यांची सदैव श्रद्धा असून, मठाच्या विविध उपक्रमांना त्यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभले आहे. आजच्या डिजिटल युगात मठाच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजासाठी त्यांनी दिलेला संगणक व प्रिंटर निश्चितच उपयुक्त ठरेल.”
मठाच्या सेवाकार्यात सातत्याने सहकार्य करणाऱ्या डॉ. परब यांचे आभार व्यक्त करताना, स्वामी समर्थांनी त्यांना सदैव यश, सुख व उत्तम आरोग्य प्रदान करावे, अशी प्रार्थनाही हडकर यांनी व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना डॉ. श्रीकृष्ण (दीपक) परब यांनी “स्वामी समर्थ मठाच्या सेवाकार्यात यापुढेही आपल्यापरीने खारीचा वाटा उचलत राहीन,” अशी ग्वाही दिली.
डॉ. परब यांच्या दातृत्वाचे, सामाजिक बांधिलकीचे आणि स्वामी निष्ठेचे उपस्थितांनी यावेळी कौतुक केले.












