खारेपाटण ग्रामपंचायत ने केले वाहतूक पार्किंग चे चोख नियोजन
व्यापारी,ग्रामस्थ व पोलिस प्रशासनाचे विशेष सहकार्य
खारेपाटण (प्रतिनिधी) : गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण या गावातील शनिवार हा आठवडा बाजार आज दि.१२ सप्टेंबर २०२६ रोजी गर्दीचा आजपर्यंतचा सर्व उच्चांक मोडत मोठ्या प्रमाणात व्यापारी,ग्राहक व नागरिकांनी फुलून गेला होता.मात्र या गर्दीला आवरण्यासाठी खारेपाटण ग्रामपंचायतीने पोलिस प्रशासन व स्थानिक व्यपारी व ग्रामस्थ तसेच तंटामुक्त समिती यांच्या मदतीने वाहतुकीचे योग्य नियोजन करून खारेपाटण बाजारपेठेत येणाऱ्या असंख्य खाजगी वाहनांना स्वतंत्र पार्किंग ची व्यवस्था करून दिली होती.त्यामुळे खाजगी वाहने योग्य रित्या पार्क केली जात होती.
गौरी गणपतीच्या सणानिमित कोकणात येणाऱ्या गणेश भक्त मुंबईकर चाकरमाण्याची गर्दी नेहमी पेक्षा यावेळी जास्तच असल्याचे दिसून आले.खारेपाटण गावाचा शनिवार आठवडा बाजार हा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असून या बाजारात आजुबाजुच्या राजापूर,देवगड,कणकवली व वैभववाडी या ४ तालुक्यातील ६० पेक्षा अधिक गावाचे सुमारे ८००० पेक्षा अधिक नागरिक आज खारेपाटणच्या आठवडा बाजारात आल्याचे स्थानिक नागरीकडून सांगण्यात आले. इतर गावातील नागरिक हे खारेपाटण बाजारालाच प्राधान्य देऊन मोठ्या प्रमाणात खरेदीला येत असतात.त्यामुळे यंदाचा खारेपाटण आठवडा बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आढळून आला.
दरम्यान खारेपाटण आठवडा बाजारात दुकानदारांनी गणपती सणासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध केले होते.तर दुकाने विविध मकर रंगीबेरंगी लाईट दिव्यांनी सजलेली दिसत होती.याबरोबरच खारेपाटण आठवडा बाजारात विविध फुले फळे जीवनावश्यक वस्तूंचे स्टॉल गर्दीने फुलून गेले होते.तर या आठवडा बाजारात यानिमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल झाली.












