आरोपी शिक्षक हेमंत सावंत विरोधात दाखल गुन्ह्यात 7 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद
देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका हायस्कुलमधील दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्याच्या कानाखाली तसेच पाठीवर हाताच्या थापटाने मारहाण करून विद्यार्थ्याला दुखापत करणारा शिक्षक हेमंत प्रताप सावंत विरोधात देवगड पोलीस ठाण्यात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण झालेल्या अल्पवयीन मुलाच्या चुलत्याने दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी शिक्षक हेमंत सावंत विरोधात अल्पवयीन न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण ) कायदा 2015 तसेच बी एन एस 2023चे कलम 15 ( 2 ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन न्याय कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यात 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. मारहाण झालेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याच्या चुलत्याने दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्यानुसार त्यांचा 15 वर्षीय पुतण्या दहावी च्या वर्गात शिकतो आहे. 19 ऑगस्ट 2026 रोजी पीडित विद्यार्थी वर्गातील त्याच्या बाजूला बसलेल्या विद्यार्थ्याला जरा बाजूला सरकून बस असे सांगत असताना शिक्षक हेमंत सावंत यांनी पाहिले आणि रागाच्या भरात हेमंत सावंत यांनी पीडित विद्यार्थ्याच्या कानाखाली आणि पाठीवर आपल्या हाताच्या थापटाने मारहाण केली.सायंकाळी शाळा सुटल्यानंतर घरी आल्यावर पीडित मुलाने त्याला शिक्षकाकडून झालेल्या मारहाणीची हकीकत आपल्या चुलतीला सांगितली. तसेच चुलते रात्री घरी आल्यावर त्यांनाही सांगितले. या गुन्ह्यातील फिर्यादी असलेले पीडित विद्यार्थ्याच्या चुलत्याने पीडिताच्या मुंबईस्थित वडिलांना फोनवरून सगळी हकीकत सांगितली. मारहाणीच्या दुसऱ्या दिवशी 20 ऑगस्ट रोजी पीडित विद्यार्थ्याचा कान दुखु लागल्यावर कणकवली येथील खाजगी डॉक्टरकडे उपचार केले. नंतर 24 ऑगस्ट रोजी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. पीएचसी मध्ये प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी अधिक वैद्यकीय उपचारासाठी पीडित विद्यार्थ्याला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र ओरोसला नेत असताना पीडित विद्यार्थ्याला चक्कर आल्यामुळे त्याला ओरोसला नेले नाही. या घटनेवरून पीडित विद्यार्थ्याच्या चुलत्याने देवगड पोलीस ठाण्यात मारहाण करणारे शिक्षक हेमंत प्रताप सावंत विरोधात दिलेल्या फिर्यादीनुसार कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.










