दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या

माझगाव डॉकची सुमारे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

राज्यात १५ हजार थेट आणि ७५ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती

मुंबई (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहामध्ये प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एन.शिप.एम.एल) आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एम.डी.एल) यांच्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे राज्यात १५ हजार थेट आणि ७५ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे.

याप्रसंगी बंदरे व परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, बिझनेस डेव्हलपमेंटचे सरव्यवस्थापक संजयकुमार सिंह, मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते. एमडीएलतर्फे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन तर एनशिपएमएलतर्फे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पी. यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

महाराष्ट्रात ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि मुंबई बंदर प्राधिकरण यांनी संयुक्तपणे नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड (एन.शिप.एम.एल) या विशेष उद्देश कंपनीची स्थापना केली आहे. केंद्र शासनाच्या ग्रीनफिल्ड जहाजबांधणी समूह विकास आराखड्यांतर्गत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असून, तो ‘मेरीटाईम अमृत काल व्हिजन २०४७’च्या उद्दिष्टांना पूरक ठरणार आहे.

या सामंजस्य करारानुसार एम.डी.एल ने दिघी येथे प्रतिवर्ष किमान २ दशलक्ष सकल टनभार (ग्रॉस टनेज) जहाजबांधणी क्षमतेचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी सुमारे २७ हजार कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणे शक्य होणार असून, देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे.

दिघी येथील या प्रकल्पामुळे आधुनिक जहाजबांधणी पायाभूत सुविधा तसेच त्यास पूरक औद्योगिक व पुरवठा साखळी परिसंस्था विकसित होणार आहे. देशांतर्गत जहाजबांधणी क्षमता वाढ, तंत्रज्ञान व गुंतवणूक आकर्षित करणे, कुशल रोजगारनिर्मिती आणि जागतिक सागरी क्षेत्रातील भारताची स्पर्धात्मकता वाढविण्यास या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे.

एम.डी.एल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन जगमोहन या उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. जटिल जहाजबांधणी, अभियांत्रिकी, प्रकल्प व्यवस्थापन आणि सक्षम देशांतर्गत पुरवठादार व्यवस्था विकसित करण्याचा अनुभव एम.डी.एल कडे आहे. सर्व संबंधित घटकांच्या सहकार्याने दिघी येथे आधुनिक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक जहाजबांधणी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी आश्वस्त केले.

error: Content is protected !!