मित्र गंभीर जखमी; नांदगाव–असलदे मार्गावरील धक्कादायक घटना
कणकवली (प्रतिनिधी) : असलदे येथे रस्त्याने दुचाकीवरून जात असलेल्या दोन युवकांच्या अंगावर अचानक मोठे झाड कोसळल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (१५ सप्टेंबर) दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत प्रतीक प्रकाश वाळके (वय २८, रा. असलदे, मधलीवाडी) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला.
प्रतीक आणि त्याचा मित्र अॅक्टीव्हा दुचाकीवरून नांदगाव ते असलदे मधलीवाडी या मार्गावरून जात होते. त्यावेळी रस्त्यालगत असलेले जुने झाड अचानक त्यांच्या दुचाकीवर कोसळले. झाडाच्या फांद्यांखाली दोघेही अडकले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. झाडाच्या फांद्या बाजूला करून दोघांना बाहेर काढण्यात आले. मात्र, प्रतीक याचा जागीच मृत्यू झाला होता. गंभीर जखमी झालेल्या त्याच्या मित्राला उपचारासाठी कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.












