कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली आगाराचे वाहक प्रवीण नेवरेकर आणि चालक सतीशचंद्र रावराणे यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे लॅपटॉप, शैक्षणिक साहित्य आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली हरवलेली बॅग तिच्या मालकाला सुखरूप परत मिळाली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोमवार, दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी जांभवडे येथील हर्षल वामन तर्फे हा गणेशोत्सवानिमित्त पुण्याहून कणकवली येथे आला होता. त्यानंतर आपल्या मूळ गावी जांभवडे येथे जाण्यासाठी तो सकाळी ७.३० वाजताच्या कणकवली-घोटगे-सोनवडे बसने प्रवास करत होता.
जांभवडे येथे बसमधून उतरताना गर्दीमध्ये अभ्यासासाठी आवश्यक असलेला लॅपटॉप असलेली स्कूल बॅग बसमध्येच राहिली. या बॅगेत लॅपटॉपसह अभ्यासाची पुस्तके, आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्ड असलेले पाकीट तसेच काही कपडे होते. बॅग हरवल्याचे लक्षात आल्यानंतर हर्षल व त्याच्या कुटुंबीयांची चिंता वाढली.
दरम्यान, सदर बँग एक दिवस बससोबत प्रवास करत होती. दुसऱ्या दिवशी प्रवासादरम्यान वाहक प्रवीण नेवरेकर यांच्या निदर्शनास ही बॅग आली. बॅगेमध्ये लॅपटॉप व इतर महत्त्वाच्या वस्तू असल्याचे लक्षात येताच त्यांनी कोणताही मोह न बाळगता ती ताब्यात घेतली. नेवरेकर यांनी बॅगेतील साहित्याची रीतसर नोंद करून ती कणकवली येथील एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली. चालक सतीशचंद्र रावराणे यांनीही यासाठी सहकार्य केले.
किमती लॅपटॉपसह महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग सुरक्षितपणे संबंधित यंत्रणेकडे सुपूर्द करून ती मालकाला परत मिळावी, यासाठी केलेली ही कृती प्रामाणिकपणाचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे. “सध्याच्या काळात असा प्रामाणिकपणा दुर्मिळच आहे. या घटनेमुळे समाजातील परस्पर विश्वास आणि माणुसकीवरील श्रद्धा अधिक दृढ झाली आहे,” अशी भावना हर्षलचे वडील तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांनी व्यक्त केली.
दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक खातरजमा करून सदर बॅग कुमार हर्षल तर्फे यांच्या ताब्यात दिली. आपल्या सर्व साहित्यांसह बॅग पुन्हा मिळाल्याचे पाहून हर्षलच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून एसटी अधिकाऱ्यांनाही समाधान वाटले.
यावेळी वामन तर्फे यांनी वाहक प्रवीण नेवरेकर आणि चालक सतीशचंद्र रावराणे यांचे मनःपूर्वक आभार मानले. नेवरेकर यांचा प्रामाणिकपणा आणि हर्षल व कुटुंबीयांची गणेशावरील नितांत श्रद्धा यामुळेच बॅग सुखरूप परत मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.












