वैभववाडी (प्रतिनिधी) : गौरी-गणपतीच्या उत्सवामुळे गेल्या काही दिवसांपासून चाकरमान्यांच्या आगमनाने गजबजलेली वैभववाडी तालुक्यातील गावे आता पुन्हा शांत होऊ लागली आहेत. शनिवारी गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर सायंकाळपासूनच मुंबई, पुण्यासह विविध शहरांकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. रविवारी पहाटेपासूनच रेल्वे, एसटी बस, खासगी आरामबस तसेच खासगी वाहनांनी चाकरमान्यांनी परतीची वाट धरल्याने वैभववाडी रेल्वे स्थानक व बसस्थानक प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेले होते. दरम्यान, काही दिवसांपासून मुलाबाळांच्या गोंगाटाने, नातेवाईकांच्या भेटीगाठींनी आणि सणाच्या उत्साहाने गजबजलेल्या गावागावांतील घरांमध्ये आता पुन्हा शांतता पसरू लागली आहे.
वैभववाडी तालुक्यातील बहुतांश कुटुंबांतील सदस्य नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई यांसह विविध शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. मात्र, वर्षभर शहरातील धावपळीचे जीवन जगत असताना गौरी-गणपतीचा सण म्हणजे आपल्या मातीशी, घराशी आणि गावाशी पुन्हा नाते जोडण्याचा हक्काचा दिवस मानला जातो. त्यामुळे गणेशोत्सवासाठी हजारो चाकरमाने कुटुंबासह आपल्या मूळ गावी दाखल झाले होते. गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक गावातील घराघरांत पाहुण्यांची वर्दळ, मुलांचा गोंगाट, नातेवाईकांच्या भेटीगाठी, गणपती आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे उत्साहाचे वातावरण होते.
शनिवारी गौरी-गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मात्र या उत्सवी वातावरणाला निरोप देण्यास सुरुवात झाली. सोमवारी कामावर रुजू व्हावे लागणार असल्याने अनेकांनी रविवारचा दिवस परतीच्या प्रवासासाठी निवडला. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच तालुक्यातील प्रमुख मार्गांवर वाहनांची मोठी वर्दळ दिसून आली. एसटी बस, खासगी आरामबस आणि खासगी वाहनांमधून चाकरमाने मुंबई-पुण्याच्या दिशेने रवाना होत होते.
पहाटेपासून रेल्वे स्थानकावर गर्दी
वैभववाडी रेल्वे स्थानकावर रविवारी पहाटे पाच वाजल्यापासूनच प्रवाशांची लगबग सुरू झाली होती. सकाळच्या जादा रेल्वेसाठी मोठ्या संख्येने प्रवासी स्थानकावर दाखल झाले होते. दिवसभर वैभववाडी येथे थांबणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळेतही स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली. हातात सामानाच्या बॅगा, डोक्यावर गठ्ठे आणि सोबत लहान मुले अशा अवस्थेत चाकरमानी आपल्या शहराकडे रवाना होताना दिसत होते.
बाजारपेठेतही चाकरमान्यांची गर्दी
परतीच्या प्रवासापूर्वी अनेक चाकरमान्यांनी वैभववाडी बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केली. आपल्या शहरातील नातेवाईक, मित्रमंडळी तसेच सहकाऱ्यांसाठी कोकणी खाद्यपदार्थ व स्थानिक वस्तू घेण्यासाठी विविध दुकानांमध्ये गर्दी झाली होती. त्यामुळे बाजारपेठेतील कोकणी मेव्याची दुकाने तसेच हॉटेल्स ग्राहकांनी फुलून गेली होती. गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेलाही काही दिवस मोठी चालना मिळाली.
गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांच्या आगमनाने गावागावातील प्रत्येक घराला जणू नवचैतन्य लाभले होते. अंगणात मुलांचा खेळ, घराबाहेर नातेवाईकांच्या गप्पा, सकाळ-संध्याकाळची लगबग आणि गणपतीच्या आरतीचा आवाज यामुळे गावांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या परतीच्या प्रवासामुळे ही गर्दी कमी होऊ लागली. काही दिवसांपूर्वी गजबजलेली घरे पुन्हा शांत होऊ लागली असून, अंगणातील मुलांचा गोंगाट आणि गावातील किलबिलाटही हळूहळू ओसरत आहे.काही घरांना कुलूप लागले, काही घरांच्या अंगणात कालपर्यंत सुरू असलेल्या गप्पा थांबल्या आणि रस्त्यांवरची वर्दळही कमी झाली. काही दिवसांसाठी गावात आलेली माणसे पुन्हा शहराकडे परतल्याने गावाने पुन्हा आपल्या नेहमीच्या शांततेची वाट धरली आहे. गणेशोत्सवाच्या आनंददायी आठवणी सोबत घेऊन चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले असून, आता पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाची प्रतीक्षा सुरू झाली आहे.












