गणेशोत्सवात एकत्र येत कोकिसरे बांधवाडीच्या तरुणांचे रक्तदान

वैभववाडी (प्रतिनिधी) : नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने तरुणाई शहरांकडे स्थलांतरित होत असताना गावाशी असलेली नाळ कायम ठेवत सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श कोकिसरे बांधवाडीतील तरुणांनी घालून दिला आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईतून गावी एकत्र येत या तरुणांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध करून देण्याचा सामाजिक उपक्रम राबविला. या उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होत आहे.

आई शिंगुदेवी युवा मंडळ, बांधवाडी आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेश पडवळ यांच्या हस्ते झाले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी युवा मंडळाच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. बांधवाडीच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या कामांना आपण सदैव सहकार्य करू, असे आश्वासन त्यांनी दिले. या रक्तदान शिबिरात २० रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वर्षभर नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत असलेले तरुण गणेशोत्सवासाठी गावी एकत्र येतात. याच काळात सामाजिक उपक्रम राबवून गरजूंच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची परंपरा कौतुकास्पद ठरत आहे. ‘गणपती उत्सव म्हणजे केवळ आनंदोत्सव नव्हे, तर समाजासाठी काहीतरी देण्याची संधी’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमासाठी मंडळाचे विशेष सल्लागार दिनेश भिसे, राजाराम गडकर, सचिन आम्रस्कर, सुरेश करंबळे, मंगेश करंबळे, लक्ष्मण पाळये, रत्नाकर फुटक, प्रकाश पाळये, अनिल भिसे, प्रकाश आम्रस्कर, महादेव भिसे, सुनील भिसे, प्रकाश परबते, विजय भिसे, शशिकांत आम्रस्कर यांचे मार्गदर्शन लाभले.उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष नागेश आम्रस्कर, सचिव सुरज धुमक, उपसचिव अनिकेत घवाळे, खजिनदार विक्रम परबते यांच्यासह सदस्य महेंद्र परबते, प्रदीप परबते, गणेश धुमक, संतोष भिसे, प्रविण पाळये, सूर्यकांत करंबळे, अक्षय आम्रस्कर, मिलिंद परबते, अक्षय परबते, कृष्णा पाळये, गणेश फुटक तसेच अन्य सभासदांनी परिश्रम घेतले.

रक्तदान शिबिरासाठी एस.एस.पी.एम. ब्लड बँकेचे मनिष यादव आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!