कोकणातील नारळ, पोकळी, टाकाऊ करवंटी पासून अनोखी कलाकृती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : निसर्गरम्य सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वारावरील फोंडाघाट- गांगोवाडी मधील डेकोरेटर, संगीत व्यासंगी आणि भजनी बुवा हर्षद अनंत सावंत यांनी, आपले बंधू-भगिनींच्या सहकार्याने, बाप्पाची अनोखी मूर्ती साकारली आहे. गणरायाच्या मस्तकावर नागराजांनी आपल्या पंचमुखी फडानी छत्र धरले आहे. कोकणातील नारळ, पोकळी यांच्या टाकाऊ भाग करवंट्या, झावळे, दगड- गोटे यापासून ही अनोखी निर्मिती केली आहे. शाडूची सुबक,सजीव रंगवलेली मूर्ती आणि टाकाऊ वस्तु पासून बनवलेला नागराज, खांब, पायथ्याचा समुद्र केवळ विलोभनीय ! त्यामुळे सध्या होत असलेला हवामानातील बदल, निसर्गाचा लहरीपणा यावरील सक्षम उपाय म्हणजे पर्यावरणाचे रक्षण ! असा संदेश यातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न या शिल्पकलेतून हर्षद यांनी साकारला आहे. गांगोवाडी च्या निसर्गरम्य, प्रसन्न, आणि श्रद्धेने नटलेल्या वातावरणात आलेले चाकरमानी भाविक यांना हा देखावा सर्वांना अंतर्मुख करतो आणि नतमस्तक होताना गौरवोद्गार बाहेर पडता तसेच गणपती बाप्पा मोरया ssss चा जयघोष आपोआप भक्तीमय वातावरणात दुमदुमुन जातो. हा देखावा पाहण्यासाठी दूर दूर वरून कलाप्रेमी व भाविकांची हर्षद च्या घरी गर्दी होत आहे……












