फोंडाघाट येथे रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न

१४ उमेदवारांची अंतिम निवड; २५ उमेदवारांची प्राथमिक निवड — १४३ उमेदवारांनी घेतला मुलाखतींचा लाभ

फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या उपक्रमांतर्गत आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळावा मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी फोंडाघाट येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित कला आणि वाणिज्य महाविद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फोंडाघाट यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आलेल्या सुमारे ४१८ रोजगार मेळाव्यांचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मा. मंगल प्रभात लोढा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पणन मंत्री मा. जयप्रकाश रावत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

फोंडाघाट येथील रोजगार मेळाव्याच्या प्रत्यक्ष कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य मा. राजन चिके, माजी पंचायत समिती सदस्य संदेश सावंत, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे संचालक मनीष गांधी,सुंदर पारकर, एम्प्लॉयमेंट सेलच्या श्रीमती मयुरी परब, उद्योजक दिनेश नारकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य भूषण सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषद सदस्य राजन चिके यांनी तरुणांनी रोजगारासाठी बाहेर भटकंती करण्याऐवजी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा आणि स्वतःला सक्षम बनवावे, असे आवाहन केले. स्थानिक उद्योग, व्यवसाय आणि कौशल्याधारित रोजगाराच्या माध्यमातून युवकांनी आत्मनिर्भर होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख डॉ. सतीश कामत यांनी प्रारंभी रोजगार मेळाव्याच्या आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार व कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योगसंस्था आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या उमेदवारांमध्ये थेट संवाद घडवून आणणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य भूषण सोनवणे यांनी रोजगार महाकुंभामागील महाराष्ट्र शासनाची भूमिका आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध उपक्रमांचे महत्त्व विशद केले. उद्घाटन सत्राचे आभार डॉ. बाजीराव डाफळे यांनी मानले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बालाजी सुरवसे यांनी केले.

या रोजगार महाकुंभ मेळाव्यात शेतकरी खरेदी-विक्री संघ, वन रीबर, ऑटोबॅन ट्रकिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, चंद्रकांत फ्रूट प्रॉडक्ट्स, रौनक एंटरप्राइज, महिंद्रा ईव्ही मोटर्स, गोवा, पाहुणेर हॉटेल, हॉटेल साटम बंधू, भारत बेंझ प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांसह विविध कंपन्या व उद्योगसंस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
सहभागी कंपन्यांकडून क्लर्क, सेल्समन, फ्रंट ऑफिस, बॅक ऑफिस, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, टेक्निशियन ट्रेनी, सेल्स एक्झिक्युटिव्ह, प्रोडक्शन सुपरवायझर, किचन हेल्पर, ऑफिस वर्क आदी विविध पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामुळे विविध शैक्षणिक पात्रता आणि कौशल्ये असलेल्या युवकांना आपल्या आवडीच्या व पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी जाणून घेता आल्या.

या रोजगार मेळाव्यासाठी सुमारे ३२६ उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. प्रत्यक्ष मुलाखतीच्या दिवशी १४३ उमेदवारांनी नोंदणी करून रोजगार मेळाव्यात सहभाग घेतला. त्यापैकी ५७ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले, तर मुलाखतीच्या प्रक्रियेतून २५ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. त्यापैकी १४ उमेदवारांची अंतिम निवड झाल्याची माहिती स्पर्धा परीक्षा व व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख डॉ. सतीश कामत यांनी दिली. नोकरीच्या शोधात असलेले, तांत्रिक शिक्षण घेतलेले तसेच विविध कौशल्ये असलेल्या पात्र युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रोजगार देणाऱ्या कंपन्या आणि रोजगाराच्या शोधात असलेले उमेदवार यांना एकाच व्यासपीठावर आणण्यात या मेळाव्याला यश आले.

रोजगार महाकुंभ मेळावा यशस्वी करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी यांच्यासह फोंडाघाट महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.
या रोजगार मेळाव्याचे आयोजन फोंडाघाट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य भूषण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
“शिक्षणातून कौशल्याकडे… कौशल्यातून रोजगाराकडे… आणि रोजगारातून उज्ज्वल भविष्याकडे!” या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या रोजगार महाकुंभाचा युवकांना आत्मनिर्भर होण्यासाठी निश्चितच उपयोग होईल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देत युवकांच्या कौशल्याला योग्य दिशा देण्याच्या दृष्टीने फोंडाघाट येथे आयोजित करण्यात आलेला हा रोजगार मेळावा महत्त्वपूर्ण ठरला.

error: Content is protected !!