नितेश गुरव आणि अनिकेत परब यांच्या धाडसाचे कौतुक; शाल व श्रीफळ देऊन केला सन्मान
आचरा (प्रतिनिधी) : आचरा समुद्रकिनारी बुडू लागलेल्या पर्यटकाचा जीव वाचविण्यासाठी धाडसाने प्रयत्न करणारे होमगार्ड नितेश विजय गुरव (कलमठ, कणकवली) आणि अनिकेत सुभाष परब (कणकवली) यांचा आचरा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
आचरा पोलीस स्टेशनमार्फत समुद्रकिनारी नियुक्त असलेल्या या दोन्ही होमगार्डनी प्रसंगावधान राखत पर्यटकाचा जीव वाचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या धाडसामुळे आणि कर्तव्यनिष्ठेमुळे एका पर्यटकाला जीवनदान मिळाले. त्यांच्या या धाडसी कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आचरा ग्रामपंचायतीतर्फे सरपंच जेरॉन फर्नांडीस, उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्याच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी पद्माकर कासले, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब आणि रुपेश परब उपस्थित होते.












