सिंधुदुर्गातील अतिरिक्त चारा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना देणार!

महिला बचत गटांच्या माध्यमातून चारा संकलन व साठवणुकीचे नियोजन करा; पशुसंवर्धन सभेत उपाध्यक्ष दादा साईल यांचे निर्देश

ओरोस (प्रतिनिधी) : राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध आहे. या अतिरिक्त चाऱ्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील पशुधनासाठी उपयोग व्हावा, यासाठी महिला बचत गट आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून चारा संकलन व साठवणुकीचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्रामसभांच्या माध्यमातून जनजागृती करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. तसेच साठविलेला चारा गरजेनुसार अन्य जिल्ह्यांत पाठविण्याचे नियोजन आतापासूनच करावे, असे निर्देश जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा पशुसंवर्धन सभापती दादा साईल यांनी दिले.

जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीची सभा आज सभापती दादा साईल यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर बिलोलीकर, समिती सदस्य गणेश राणे, संतोष पारकर, रामा गवस, प्रज्ञा चव्हाण, शीतल दळवी, संजय गावडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील चारा उपलब्धता आणि दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांवर सभेत चर्चा झाली. अन्य जिल्ह्यांमध्ये दुष्काळामुळे चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असताना सिंधुदुर्गात मात्र पुरेसा चारा उपलब्ध असल्याचे सभेत सांगण्यात आले. त्यामुळे सध्या नव्याने चारा निर्मिती करण्यापेक्षा उपलब्ध चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे सभापती साईल यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेला सुका आणि ओला चारा वेळीच कापून त्याची शास्त्रीय पद्धतीने साठवणूक करणे गरजेचे आहे. यासाठी महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा. चारा कापणी, संकलन, साठवणूक आणि वाहतूक याबाबत शेतकरी व बचत गटांना आवश्यक मार्गदर्शन करावे. ग्रामसभांमधून यासंबंधी जनजागृती करून गावनिहाय चारा संकलनाचे नियोजन करावे, अशा सूचना साईल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
एकत्रित केलेल्या चाऱ्याची नियोजनबद्ध साठवणूक झाल्यास भविष्यात गरज भासणाऱ्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना त्याचा पुरवठा करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर चारा संकलन आणि विक्रीतून स्थानिक शेतकरी व महिला बचत गटांना उत्पन्नाचे अतिरिक्त साधनही उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे या उपक्रमाकडे केवळ दुष्काळ निवारणाची उपाययोजना म्हणून न पाहता ग्रामीण भागातील उत्पन्नवाढीची संधी म्हणूनही पाहावे, असे साईल यांनी सांगितले.

७५ हजार किलो मका बियाण्यांचे वाटप
जिल्ह्यात यावर्षी ७५ हजार किलो मका बियाण्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली. सातबारा उताऱ्यावर नाव असलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्याकडील उपलब्ध सुका व ओला चारा कापून त्याची योग्य साठवणूक करावी. जेणेकरून प्रशासनाला हा चारा एकत्रित करून आवश्यकतेनुसार अन्य जिल्ह्यांत पाठविण्याचे नियोजन करता येईल, असे आवाहन सभापती दादा साईल यांनी केले.

चारा संकलनातून महिलांना रोजगाराची संधी
जिल्ह्यातील अतिरिक्त चारा संकलित करण्यासाठी महिला बचत गटांना प्राधान्याने सहभागी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. गावपातळीवर चारा संकलन व साठवणुकीची व्यवस्था उभी राहिल्यास उपलब्ध चाऱ्याची नासाडी टाळण्याबरोबरच बचत गटांना आर्थिक उत्पन्न मिळविण्याची संधी निर्माण होणार आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेऊन बचत गट आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करावे, असे निर्देश सभापती साईल यांनी दिले.

error: Content is protected !!