स्थानिक बाजारपेठेला ताकद देणारा दिवाळी बाजार जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देईल

पालकमंत्री नितेश राणे ; भाजप आयोजित दिवाळी बाजाराचे उद्घाटन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा सध्या दुष्काळाच्या संकटात असून ट्रिगर वनमध्ये आहे. अशा परिस्थितीत स्थानिक बाजारपेठेला ताकद देणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधिक वाढले आहे. दिवाळी बाजारात होणारा प्रत्येक व्यवहार हा जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देणारा असून त्याचा थेट परिणाम स्थानिक नागरिकांच्या जीवनमानावर होणार आहे. त्यामुळे स्थानिक विक्रेते, व्यावसायिक आणि बचत गटांतील महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणारा कणकवली भाजपचा दिवाळी बाजार आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आर्थिक आधार ठरेल, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टी, कणकवली पुरस्कृत दिवाळी बाजाराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

कणकवली शहरातील पेट्रोल पंपासमोरील फ्लायओव्हर ब्रिजखाली या दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. गेली आठ वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या या बाजारात आकाशकंदील, मातीच्या पणत्या, हस्तकलेच्या वस्तू, हाताने विणलेल्या वस्तू तसेच दिवाळीचा फराळ अशा विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांना एकाच ठिकाणी विविध वस्तू मिळत असून स्थानिक विक्रेते, व्यावसायिक आणि बचत गटांतील महिलांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या या दिवाळी बाजाराच्या माध्यमातून स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. बचत गटांतील महिलांनी स्वतःच्या मेहनतीतून तयार केलेल्या विविध वस्तू येथे विक्रीसाठी मांडल्या आहेत. त्यामुळे दिवाळी खरेदीसोबतच स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची संधी नागरिकांना मिळत आहे.

यावेळी बोलताना ना. नितेश राणे म्हणाले की, भाजपचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि पक्षातील सहकाऱ्यांनी एकत्र येऊन या उपक्रमाची सुरुवात केली. त्यावेळी हा उपक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्तारेल, याची कदाचित कल्पनाही नव्हती. मात्र, आज कणकवलीकर दरवर्षी भाजपच्या दिवाळी बाजाराची आतुरतेने वाट पाहतात. या बाजारात बचत गटांतील महिला अनेक महिन्यांपासून विविध वस्तू तयार करण्यासाठी मेहनत घेतात. त्यांच्या मेहनतीतून तयार झालेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होत असून महिलांना आर्थिक बळ मिळत आहे.

स्थानिक बाजारपेठेला अधिकाधिक ताकद देण्याचे काम प्रत्येक सिंधुदुर्गवासीयाने केले पाहिजे. या बाजारपेठेत होणारा प्रत्येक व्यवहार हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देणारा असून त्याचा थेट परिणाम स्थानिक नागरिकांच्या जीवनमानावर होणार आहे. त्यामुळे अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. या उपक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या भाजपच्या महिला कार्यकर्त्या, शहरातील पदाधिकारी आणि सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करण्याबरोबरच जनतेचे सेवक म्हणून केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर म्हणाल्या, एका लक्ष्मीने दुसऱ्या लक्ष्मीला दिलेला हा आधार आहे. महिलांना आपल्या अंगातील कलागुणांना वाव देण्यासाठी मिळालेले हे व्यासपीठ आहे. जेव्हा संधी मिळेल, तेव्हा त्या संधीचे सोने करा. आपल्या स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करा, तरच त्यांची उन्नती होऊ शकते. आपणच आपल्या व्यापाऱ्यांचे हात बळकट केले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले.

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले की, कणकवलीतील प्रत्येक व्यावसायिक भगिनीने व्यवसायाचे लायसन्स घेऊन या दिवाळी बाजारात सहभाग घेतला आहे. महिलांनी व्यवसायाच्या माध्यमातून पुढे यावे, या उपक्रमात सहभागी व्हावे आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार करावा, असे आवाहन करत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या उद्घाटन सोहळ्याला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांच्यासह नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, मनस्वी ठाणेकर, आर्या राणे, गणेश ऊर्फ बंडू हर्णे, संजय कामतेकर, राकेश राणे, स्वप्निल ऊर्फ दादू राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, बंडू गांगण, सागर राणे, पप्पू पुजारे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, गौतम खुडकर, समीर प्रभुगावकर, अभिषेक नाडकर्णी, लक्ष्मण घाडीगांवकर, अभय राणे, रंजन राणे, अमोल रासम, सभापती हर्षदा वाळके, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, सुप्रिया पाटील, शीतल दळवी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!